पिंपरी : कर संवादात नागरिकांच्या समस्यांचा निपटारा | पुढारी

पिंपरी : कर संवादात नागरिकांच्या समस्यांचा निपटारा

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मिळकतधारकांच्या मिळकत कराबाबत असलेल्या विविध शंका, प्रश्न व अडचणींचा निपटारा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांशी ‘कर संवाद’ घेतला. जून अखेरच्या सवलतींची माहिती मिळण्यासाठी झालेल्या संवादाला नागरिकांनी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने प्रतिसाद दिला. या ‘कर संवाद’साठी 40 पेक्षा जास्त नागरिक ऑनलाइन तर, 30 पेक्षा जास्त नागरिक कर संकलन कार्यालयात उपस्थित होते. त्यांच्या समस्यांचे कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी निराकरण केले.

उपयोगकर्ता शुल्क कशासाठी? अवैध बांधकाम शास्ती समायोजन कधीपासून? सामान्य करातील सवलती कोणाला व किती? विलंब शुल्क कधी पासून? अशा अनेक प्रश्नांचे निरसन करण्यात आले. त्याचबरोबर नागरिकांनी दिलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्याबाबत अधिकार्‍यांना आदेश देण्यात आले.

‘उपयोगकर्ता शुल्क’ हे नागरिकांची पिळवणूक नसून, सरकारच्या आदेशानुसार नागरिकांना कचरा संकलन व विलगीकरण यासाठी मिळणार्‍या सेवेसाठीचे शुल्क असल्याचे देशमुख यांनी सांगितले. महापालिकेचा विकासकामातील खर्च व उपयोगकर्ता शुल्कातून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत व नागरिकांना सेवा देण्याचे शुल्क असल्याचे सांगत, त्यांच्या मनातील संभ—म दूर करण्याचा प्रयत्न केला.

मिळकतकर भरल्यास या सवलती

सामान्यकरात आगाऊ भरणा केल्यास 5 टक्के, ऑनलाइन कराचा भरणा केल्यास 5 टक्के, महिलांच्या नावे असणार्‍या एका निवासी मालमत्तेस 30 टक्के, दिव्यांगांना 50 टक्के, माजी सैनिकांना 100 टक्के, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) व ऑनसाईट खत निर्मतिी यंत्रणा – 5 टक्के, शून्य कचरा (झिरो वेस्ट) आणि एसटीपी प्लांटसाठी 10 टक्के अशा सवलती आहेत.

तीस जूनपर्यंत सवलतीचा लाभ

30 जूनपर्यंत मिळकतकराचा भरणा न केल्यास आगामी काळात करसंकलन विभागाच्या जप्ती मोहिमेला थकबाकीदारांना सामोरे जावे लागणार आहे. थकबाकीदारांना दर महिन्यास दोन टक्के विलंब शुल्क लावले जाणार आहे. ज्या नागरिकांनी मिळकतकरावरील सवलतींचा लाभ घेतला नाही, त्यांनी 30 जूनपूर्वीच या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा

पिंपरी शहरावर पाणीकपातीचे संकट

पुण्यातील शुक्रवार पेठेत ज्येष्ठ दाम्पत्य आढळले मृतावस्थेत

52 देश फिरणारा 17 वर्षांचा पायलट!

Back to top button