वडगाव मावळ : खंडणी मागणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

वडगाव मावळ : खंडणी मागणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

वडगाव मावळ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : माझ्याकडे तुमचे खासगी फोटो आहेत, मला 30 लाख रुपये दे, नाहीतर खासगी फोटो समाजमाध्यमावर प्रसारित करून बदनामी करील, अशी मोबाईलद्वारे धमकी देऊन खंडणी मागणार्‍या आरोपीस वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली आहे. देवानंद शंकर भोंगड (29 रा. वनोणा, ता. मंगळुरू पीर, जि. वाशीम) असे या आरोपीचे नाव असून त्याला वडगाव मावळ पोलिसांनी त्याला वाशीम जिल्ह्यातून ताब्यात घेत अटक केली आहे.

देवानंद हा मजूर कामगार असून, गुन्ह्यातील फिर्यादी महिलेकडून आरोपीच्या मोबाईल फोनवर चुकून मिस्डकॉल गेला होता. त्यामुळे आरोपीला फिर्यादी महिलेचा मोबाईल नंबर प्राप्त झाला होता. त्यानंतर तो वारंवार फिर्यादी महिलेला मोबाईल फोनवर फोन करून त्यांचेशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. नंतर आरोपीने फिर्यादी यांना माझेकडे तुमचे खासगी फोटो आहेत. ते खासगी फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करून तुमची बदनामी करणार असल्याची धमकी देऊन, तसेच फिर्यादी यांचे लहान मुलीचे अपहरण करण्याची धमकी देऊन फिर्यादी महिला व तिच्या पतीकडे 30 लाख रुपये खंडणीची मागणी केली होती.

फिर्यादी महिलेचे घरातील लोक भयभित झालेले होते, फिर्यादी महिलेस आरोपीकडून होणारा त्रास असहाय्य झाल्याने त्यांनी वडगाव मावळ पोलीस ठाणेमध्ये येवून घडत असलेला प्रकार सांगितला. पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी घटनेचे गांभीर्य जाणून अज्ञात आरोपी विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून तांत्रिक तपास चालू केला होता.

यामध्ये तीन वेगवेगळे मोबाईल फोनवरून धमकी देणारा आरोपी हा वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक विलास भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस हवालदार सचिन काळे, सचिन गायकवाड, श्रीशैल कंटोळी, अमोल कसबेकर यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीचे नाव पत्ता निष्पण करून त्याला वाशिम येथे जावून अटक करून त्याचेकडील मोबाईल फोन व तीन सिमकार्ड जप्त केलेले आहेत.

नागरिकांनी व विशेषतः महिलांनी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेले फोन टाळावेत व प्रतिसाद देऊ नये तसेच अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेले कॉलवरील बोलणारे व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये. महिलांनी आपली वैयक्तिक माहिती व खासगी फोटो कोणाशीही शेअर करू नये. तसेच आपल्याला अनोळखी व्यक्तींकडून फोन येत असल्यास तात्काळ सायबर पोलिस अथवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.

– विलास भोसले, पोलिस निरीक्षक, वडगाव मावळ

हेही वाचा

पुणे : इंदापुरात रानगव्याचा परत जनावरांवर हल्ला

आता ‘दत्तवाडी’ नव्हे ‘पर्वती’ पोलिस ठाणे म्हणा

किनगाव परिसरातील दोन मुले बेपत्ता; नागरिकांत घबराटीचे वातावरण

Back to top button