जुने संस्कार नव्या पिढीला कळण्यासाठी टिफीन बैठक : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

जुने संस्कार नव्या पिढीला कळण्यासाठी टिफीन बैठक : चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ना. स. फरांदे, गोपीनाथ मुंडे, उत्तमराव पाटील या नेत्यांनी घरून जेवणाचे डबे आणून कार्यकर्त्यांसोबत खाऊन पक्ष वाढविला. आजच्या काळात पक्षाचे जुने संस्कार नवीन पिढीच्या कार्यकर्त्यांना कळावेत, यासाठी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये टिफीन बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
’मोदी 9’ अभियानांतर्गत भांडारकर इन्स्टिट्यूट येथे शनिवारी आयोजित केलेल्या टिफीन बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बावनकुळे बोलत होते. या वेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले की, जुनी संस्कृती रुजावी, यासाठी टिफीन बैठकीचे आयोजिन केले आहे. आपल्या आमदारांनी आणि ज्या ठिकाणी आमदार नाहीत, तेथे प्रचारप्रमुख व इतर नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाध साधायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर देशाची कशी प्रगती झाली. जगातील 150 देशांनी मोदींच्या प्रभावी नेतृत्वाचे कौतुक केले आहे. नऊ वर्षांत अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत. ज्या इंग्रजांनी दीडशे वर्षे आपल्यावर राज्य केले, त्या इंग्रजी महासत्तेला भारताने खाली खेचून जगात पाचवा क्रमांक मिळविला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने, तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रगती केली आहे.

काँग्रेसने मात्र गेली 75 वर्षे समाजामध्ये दुही माजवून, समाजात भाजपबद्दल भीतीचे वातावरण निर्माण करून सत्ता उपभोगली, असेही बावनकुळे म्हणाले. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची टिफीन बैठक कोंढवे-धावडे येथील दामिनी लॉन्स येथे झाली. या वेळी बानवकुळे यांच्यासह आमदार भीमराव तापकीर आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या वेळीही बावनकुळे यांनी मोदी यांनी नऊ वर्षांत केलेले काम घरोघरी पोहचविण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा : 

मान्सूनचा पुन्हा चकवा

नागपूर : हवामान अंदाज चुकला, मान्सून लांबला,विदर्भात उष्णतेची लाट

Back to top button