पुणे-मुंबई महामार्गावरील सुरक्षा कठडे ठरताहेत जीवघेणे | पुढारी

पुणे-मुंबई महामार्गावरील सुरक्षा कठडे ठरताहेत जीवघेणे

देहूरोड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्यातील गजबजलेला महामार्ग म्हणजे पुणे-मुंबई महामार्ग. या महामार्गावरील निगडी ते देहूरोड हा सव्वाचार किलोमीटरचा रस्त्याचे काम बरेच वर्षे प्रलंबित होते. दोन-तीन वर्षांपूर्वी मुहूर्त निघाला आणि या रस्त्याचे चौपदरीकरण झाले; मात्र चौपदरीकरणानंतरही रस्त्याच्या बाजूला बसवलेले सुरक्षा कठडे हेच जीव घेणे ठरू लागले आहेत. रस्ता झाल्यानंतर पाच वर्षे त्याची डागडुजी ठेकेदाराने करायची, असे ठरले होते. मात्र एक दोन वर्षातच ठेकेदार डागडुजीकडे दुर्लक्ष करत असल्याचे
चित्र आहे.

कंत्राटदाराचे दुर्लक्ष

  • अनेक ठिकाणी सुरक्षा कठड्यांचे खिळे निसटलेले आहेत.
  • सुमारे वीस पंचवीस फूट सुरक्षा कठडे रस्त्यावर लोळत आहेत.
  • अनेक झाडांसाठी लावलेले सुरक्षा कडे बिनकामाचे उरले आहेत.
  • या ठिकाणी वाहने रात्रीच्या वेळी धडकून अपघात होतात.
  • पिंपरी चिंचवडची वृक्षप्रेमी संघटना तोंडावर बोट ठेवून हा प्रकार पहात आहे.
  • त्यामुळे रस्त्याच्या कंत्राटदार याकडे लक्ष देण्यास तयार नाही.

रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता

सुरक्षा कठड्यांचे जागोजागी खिळे निसटलेले आहेत. काही ठिकाणी वीस पंचवीस फुटांपर्यंत हे सुरक्षा कठडे जमिनीवर लोळत आहेत. जीआय मटेरियल असल्यामुळे कोणी सहसा चोरण्याच्या भानगडीत पडत नाहीत, नाहीतर चोरट्यांनी कधीच हे हद्दपार केले असते. कंत्राटदार या गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. तर रस्ते विकास मंडळाचे अधिकारी इकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. याबाबत अनेक वेळा अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली.

1 पुणे- मुंबई महामार्ग म्हणजे देशाच्या आर्थिक प्रणालीतील महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यावर देहूरोड ते निगडी हा पट्टा अनेक वर्ष दुपदरीच होता. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याची डागडुजी झाली आणि महामार्ग सोयीचा ठरू लागला. पण ते काही काळापुरतेच.

2 कारण एक दोन वर्षात रस्त्याच्या कडेला लावलेले सुरक्षा कठडेच असुरक्षित ठरू लागले आहेत. निगडी ते देहूरोड या सव्वाचार किलोमीटरच्या अंतरात जवळपास वीसएक झाडे आहेत. हे झाडे तोडण्यास पिंपरी-चिंचवडच्या एका संस्थेने कोर्टात केस केली होती. त्यानुसार, ही झाडे ठेवण्यात आली. आज ही झाडे नाहीशी झाली आहेत, पण त्यांना लावलेले सुरक्षा कठडे जागेवरच आहेत. किंबहुना अपघाताला निमंत्रण ठरत आहे.

हेही वाचा

पिंपरी : महात्मा बसवेश्वरांनी समता, बंधुतेचा पुरस्कार केला : मुख्यमंत्री शिंदे

हिंगोलीत ५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; कृषी विभागाची धडक कारवाई

पिंपरी : दोन हजार 400 कुटुंबीयांना मिळाले पीएमआरडीएचे घर

Back to top button