हिंगोलीत ५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; कृषी विभागाची धडक कारवाई

हिंगोलीत ५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; कृषी विभागाची धडक कारवाई

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीत खत व बियाणे विक्रीच्या दुकानांवर कृषी विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये 3 कृषी सेवा केंद्रांचे खत विक्रीचे परवाने 7 दिवसांसाठी तर दोन कृषी सेवा केंद्रांचा बियाणे व खत विक्रीचे परवाने 10 दिवसांसाठी निलंबीत केले आहेत.

जिल्हयातील शेतकरी खरीप हंगामात पेरणीच्या तयारीला लागला आहे. या शेतकऱ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण कृषीनिविष्ठा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी वारंवार आढावा बैठका घेऊन कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करून त्रुटी आढळून आलेल्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र जिल्हाधिकारी पापळकरांच्या आदेशालाच कृषी खात्याने हरताळ फासला असल्याचे चित्र आहे. जिल्हयात कापूस बियाणांची चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी सुरु आहेत. मात्र त्याकडे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

शहरात कृषी विभागाने काही दुकानांची तपासणी केली. यामध्ये पाच दुकानांकडून कृषी सेवा केंद्राच्या परवान्यातील अटी, शर्तीचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या पाच कृषी सेवा केंद्राच्या परवान्यावरील कार्यवाहीचा प्रस्ताव परवाना अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी हिंगोलीतील आराध्या कृषी सेवा केंद्र, रुद्र कृषी केंद्र, किसान केंद्र या कृषी सेवा केंद्राचा खत विक्री परवाना सात दिवसांसाठी तर उदयराज ट्रेडर्स हिंगोली व तुळजाई कृषी सेवा केंद्र हिंगोली या कृषी सेवा केंद्रांचा बियाणे विक्री परवाना 10 दिवसांसाठी निलंबित केला आहे. कृषी विभागाच्या या मोठ्ठ्या कारवाईची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. सध्या जिल्हयात पाऊस नाही त्यामुळे पेरणीसाठी बियाणे व खतांच्या दुकानावर गर्दी नाही. पुढील आठ ते दहा दिवसांत पाऊस झाल्यास पेरणी सुरु होईल. त्यावेळी मात्र या दुकानदारांचे परवाने पुन्हा बहाल होतील. त्यामुळे कृषी विभागाची कारवाई निव्वळ दिखावा असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news