पुणे : वडगावशेरी परिसरात पाण्याचा खडखडाट ! भामा आसखेड योजनेची जलवाहिनी फुटल्याचा परिणाम | पुढारी

पुणे : वडगावशेरी परिसरात पाण्याचा खडखडाट ! भामा आसखेड योजनेची जलवाहिनी फुटल्याचा परिणाम

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या दोन दिवसांपासून वडगाव शेरी मतदारसंघातील धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, वडगावशेरी, विमाननगर, चंदननगर, परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गुरुवारी (दि. 15) संपूर्ण पाणीपुरवठा बंद होता, तर शुक्रवारी (दि. 16) भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना पाणी मिळाले नाही. वडगाव शेरी येथील टँकर भरणा केंद्रावरील पाणी संपल्याने नागरिकांना दिवसभर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा पूर्णत: बंद असतो. शुक्रवारी भामा आसखेड त्यांनातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन ठिकाणी फुटल्याने वडगाव शेरी मतदारसंघाचा पाणीपुरवठा गेल्या दोन विस्कळीत झाला आहे. पाणी मिळण्यासाठी टँकर केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, टँकर भरणा केंद्रावरील देखील पाणी संपल्याने नागरिकांना कुठेच पाणी मिळेनासे झाले आहे. या भागातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शनिवारी या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्यांचे अधिकार्‍यांनी सांगितले.

विमानतळासाठी 19 टँकरचा पुरवठा
गुरुवारी पूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असताना 19 टँकर पाणी वडगाव शेरी टँकर भरणा केंद्रावरून पाठविण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी चलनदेखील काढले नाही. केवळ अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून ठेकेदाराने हा पाणी पुरवठा केला. नागरिकांना पाणी पिण्यासाठी नसताना विमानतळावर पाणी का पाठविण्यात आले, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अधिकारी नितीन जाधव म्हणाले की, विमानतळावर पाणी नसल्याने जी 20 परिषेदेसाठी येणार्‍या पाहुण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वरिष्ठांनी सांगितल्यानुसार हे टँकर पाठविण्यात आले आहेत.

भामा आसखेड धरणातून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी वाहून नेणारी जलवहिनी करंजे येथे गुरुवारी रात्री फुटली होती. ती सकाळी दुरुस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, पुन्हा दुसर्‍या ठिकाणी जलवाहिनी फुटली असून, शनिवारी (दि. 17) पहाटेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल.
             – रमेश वाघमारे, कार्यकारी अभियंता, बंडगार्डन पाणीपुरवठा विभाग 

हे ही वाचा : 

पुणे-नाशिक महामार्गावर कार दुभाजकाला धडकली : एक ठार

पुणे जिल्ह्यातील 18 धरणांनी गाठला तळ

Back to top button