

नितीन राऊत :
जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :
वारी हो वारी देई कागा मल्हारी । त्रिपुरारी हरी तुझ्या वारीचा मी भिकारी। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी। आलो तुमच्या दारी ….द्यावी आम्हा वारी बेलभंडाराची वारी । अहंम वाघ्या सोहम वाघ्या प्रेमनगरा वारी सावध होऊनी भजनी लागा । देव करा कैवारी। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी।
अशा संत श्री एकनाथांच्या ओवी गात…नाचत…'सदानंदाचा येळकोट.. येळकोट… जयमल्हार' असा जयघोष करीत वैष्णवांचा मेळा खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत प्रवेशला. या वेळी जेजुरी नगरपालिका, जेजुरी देवसंस्थान व ग्रामस्थांच्या वतीने देवाचे लेणं असणारा भंडार उधळून माउली व वैष्णवांचे स्वागत केले. शुक्रवारी (दि. 16) सासवड-जेजुरीची वाट वैष्णवांनी फुलून गेली होती. ऊन-सावली व ढगाळ वातावरण दिवसभर होते. सकाळी बोरावके मळा येथील न्याहारीनंतर दुपाई यमाई-शिवरी येथील आदिशक्ती यमाईमातेचे दर्शन शिवरीकरांचे स्वागत व भोजन उरकून दुपारी पालखी सोहळा मल्हारी भेटीसाठी मार्गस्थ झाला. खांद्यावर भगवी पताका, ओठी 'ज्ञानोबा -तुकोबारायां'ची ओवी गात, टाळ-मृदंगाच्या साथीने नाचत, वैष्णव जेजुरीकडे निघाले.
सायंकाळी 5 वाजता पालखी सोहळ्याने जेजुरीनगरीत प्रवेश केला. रस्त्यावर आकर्षक रांगोळी घालण्यात आली होती. कडेपठार कमानीजवळ जेजुरी नगरपालिका, जेजुरी देवसंस्थान व नागरिकांनी माउलींच्या रथाचे, पालखी सोहळ्यातील दिंड्याचे व वैष्णवांचे भंडारा उधळणीत स्वागत केले. मुख्य शिवाजी चौकात श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने स्क्रीन लावून लाइव्ह दर्शनाची सोय केली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणार्या व ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठी असणार्या शासकीय नऊ एकराच्या भव्य पालखीतळावर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा विसावला.
हे ही वाचा :