हिंजवडी : कासारसाई धरण परिसरात सुरक्षेची वाणवा | पुढारी

हिंजवडी : कासारसाई धरण परिसरात सुरक्षेची वाणवा

हिंजवडी (पुणे) : वर्षाविहार आणि पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातून कासारसाई धरण परिसरास प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्यादेखील वाढत आहे. परंतु, सुविधांची वाणवा, सुरक्षिततेसाठी अपुरा पोलिस बंदोबस्त आणि सूचना फलकांचा अभाव दिसत असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

पर्यटकांना मद्यपींचा त्रास

गेल्या महिनाभरापासून पारा वाढल्याने वातावरणात उकाडा आहे. अशा या उकाड्यात कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, इथे सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली नसल्याने पर्यटक बुडाल्याच्याही घटना घडल्या आहेत. एकीकडे धरणाचे पाणी तर सभोवती हिरवागार डोंगर त्यामुळे पर्यटकांसह मद्यपी याठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. धरणातील पाणी कमी असो व जास्त पर्यटक मात्र मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे येथील हॉटेलमध्येदेखील गर्दी असते. मात्र, अनेक तळीराम रात्री- अपरात्री परिसरातील बंधार्‍यांवर आणि शेतीमध्ये सर्रास पार्टी करत असतात. त्यामुळे येथील पर्यटकांना असुरक्षित वाटते.

दारूच्या बाटल्यांचा खच

पोलिसांकडून पावसाळ्यात येथे चेकपोस्टद्वारे बंदोबस्त केला जात असतो. मात्र, पर्यटनस्थळी निसर्गाचा आनंद केवळ पावसाळ्यातच घेतला जातो. इतर दिवशी मात्र मद्यप्राशन करून हुल्लडबाज राडा करत आहेत. आडोसा किंवा नयनरम्य ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा ढीग, सिगारेटची पाकिटे दिसत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त कायमस्वरूपी असावा, अशी मागणी पर्यटकांसह, स्थानिकांमधून होत आहे.

सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, सुरक्षारक्षक उपलब्ध करणे, ठिकठिकाणी सूचनाफलक लावणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यास मनाई करणारे फलक लावणे आवश्यकता आहे. आपले कृत्य जिवावर बेतू शकते, याची जाणीव ठेवून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे काही खासगी सुरक्षारक्षकांच्या भरवश्यावर येथील सुरक्षा व्यवस्था असल्याने एखाद्या मोठ्या अपघातानंतर प्रशासन जागे होणार काय? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

कासारसाई-धरण रस्त्याची दयनीय अवस्था

कासारसाई ते धरण रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत आहे. वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या या जागेतील रस्त्याची साधी डागडुजीदेखील करण्यात आली नाही. अशा परिस्थितीत वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते. पर्यटक जिवावर उदार होऊन फोटोसाठी स्टंटबाजी करत असतात. त्यामुळे अनेकजण जिवालाही मुकले आहेत. धोकादायक ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव करणे आवश्यक केले असले तरी अशा पर्यटकांनीही आपल्या अतिउत्साहाला बांध घालण्याची गरज आहे.

हेही वाचा

महाराष्ट्रात बंदी, कर्नाटकात मात्र उपसा सुरूच; दूधगंगेवरील प्रकार

पुरंदरच्या तळ्यात 30 टक्के पाणीसाठा

Back to top button