

वाल्हे : पुढारी वृतसेवा : 'धरण उशाला, कोरड घशाला' अशी म्हणण्याची वेळ आता राख, कर्नलवाडी (ता. पुरंदर) व परिसरातील नागरिकांवर आली आहे. पुरंदर तालुक्यातील कायम दुष्काळी असा शिक्का असलेल्या दक्षिण पूर्व हा भाग. या भागाला वरदान असलेले राख येथील बि—टिशकालीन तलावात आज रोजी 30 टक्के पाणीसाठा असला तरी तळ्याच्या खालच्या भागातील विहिरी मात्र कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. यावर्षी पूर्व मौसमी वळवाचा एकही पाऊस झाला नाही. तसेच आता पावसाने ओढ दिल्याने राख, कर्नलवाडी, गुळूंचे व वाल्ह्याच्या पूर्वेकडील वाड्या-वस्त्यांवरील शेतकर्यांना चिंता वाटत आहे. जूनच्या दुसर्या आठवड्यात पेरण्या सुरू होतात, मात्र पावसाने ओढ दिल्याने यावर्षी पेरणीपूर्व मशागती करून आता शेतकर्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
राखच्या उत्तर व पूर्व दिशेला असलेल्या डोंगर रांगातून येणारे पावसाचे पाणी पुणे-मिरज रेल्वे लाईन बंधारा, छोटे पाझर तलाव, फांज ओढ्यावरील तलाव व बि—टिशकालीन तलावात येते. मागील काळात सलग तीन वर्षे बि—टिशकालीन तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर उपसला गेला होता. परिणामी तळ्याची खोली वाढली, त्यामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम माने वस्ती, रणवरेवाडी, कर्नलवाडी, झिरिपवस्ती, गुळूंचेच्या वाड्या वस्त्यांवरील विहिरींची पाणीपातळी वाढणे क्रमप्राप्त होते. मात्र, यावर्षी दोन्ही तलावात मुबलक पाणीसाठा असूनही या भागातील विहिरींनी तळ गाठला आहे, ही बाब चिंताजनक असल्याची चर्चा परिसरातील लोक करत आहेत.
जिलेटीन स्फोटांचा परिणाम
राख येथील बि—टिशकालीन तलावातील गाळ मागील काळात मोठ्या प्रमाणात काढला गेला. याच काळात राख गावच्या पूर्वेला दगडखाणींना परवानगी देण्यात आली. खाणीतून दगड फोडण्यासाठी जिलेटीनचे स्फोट घेतले जातात. आता या खाणींची खोली प्रचंड झाली आहे. त्यामुळे तलाव परिसरातील भूगर्भातील पाण्याचे सप हलले असावेत, अशी शंका येथील शेतकरी व्यक्त करत आहेत.
मागील अनेक वर्षांपासून राख परिसरातील तळे पावसाळ्यात भरुन वाहिले की, खालच्या भागातील विहिरी पुढील पावसाळ्यापर्यंत तग धरायच्या; मात्र आता तळ्यातील गाळ काढल्यानंतर तळ्यात पाणी असूनही तळ्यालगत असणार्या विहिरींनी तळ गाठला आहे. याची गंभीर दखल भूजल सर्वेक्षण करणार्या यंत्रणेने घेणे गरजेचे आहे.
– भरत निगडे, माजी उपसरपंच, कर्नलवाडी