पुणे : शाळांची घंटा वाजली; भिंतीही बोलू लागल्या | पुढारी

पुणे : शाळांची घंटा वाजली; भिंतीही बोलू लागल्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुटी संपवून शाळेच्या पहिल्या दिवशी सवंगड्यांना भेटण्याची ओढ, नवीन गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने चेहर्‍यावर ओसंडून वाहणारा आनंद, तर काहींमध्ये असलेली शाळेची भीती, आई-बाबांपासून दूर जायचे म्हणून कोसळलेले रडू, अशा संमिश्र वातावरणात गुरुवारी (दि. 15) शहरातील शाळांमध्ये शाळेची पहिली घंटा वाजली. शहरातील शाळांमध्ये सकाळी तसेच दुपारच्या सत्रात प्रवेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा परिसरात फुलांसह रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.

शहरातील विविध शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शाळांमध्ये फुलांच्या माळा, तोरणे, फुगे, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या आदी सजावट करण्यात आली होती. मिकी माऊस, डोरेमोन, छोटा भीम, फ्रेंड गणेशा असे विद्यार्थ्यांना आवडणारे कार्टून्स स्वागतासाठी सज्ज होते. शिक्षकांसह शालेय समितीतील पदाधिकार्‍यांनी शाळेत पाऊल ठेवणार्‍या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन बँड पथकाच्या निनादात स्वागत केले. यामध्ये सनई-चौघडा व तुतारीचे स्वर आणि बालगीते उत्साहात भर घालत होती. अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने थोडा वेळ का होईना; पण आई-बाबांपासून दूर राहायचे, या कल्पनेने या मुलांना रडू कोसळले होते. शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची फलकावर लावलेल्या यादीमध्ये नाव शोधण्याची लगबग दिसून आली, तर काही मुले नवीन मित्रांशी गट्टी जमविताना दिसली.

रिक्षावाले काकांची प्रतीक्षा
शाळेच्या पहिल्याच दिवशी रिक्षावाल्या काकांचेही काम सुरू झाले. सकाळी साडेसहा वाजल्यापासून रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षा धावू लागल्या होत्या. विद्यार्थीही रिक्षावाले काकांची वाट पाहत सकाळीच तयारी करून घराबाहेर उभे होते. बर्‍याच दिवसांनंतर जुने मित्र भेटल्याचा आनंद मुलांमध्ये होता. पहिल्याच दिवशी नवीकोरी पुस्तके मिळाल्याने मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.

हे ही वाचा : 

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संनियंत्रण समिती घोषित करा : छगन भुजबळ यांची मागणी

कर्नाटकात धर्मांतरबंदी उठणारच; मंत्रिमंडळाचा निर्णय

Back to top button