स्टार्टरला चावी दिसली आणि चोरट्यामधील ड्रायव्हर जागा झाला…. पळवली चक्क पीएमपी ! | पुढारी

स्टार्टरला चावी दिसली आणि चोरट्यामधील ड्रायव्हर जागा झाला.... पळवली चक्क पीएमपी !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पालखी सोहळ्यामुळे पीएमपी बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने पीएमपी बस पूलगेट आगारात न लावता सारसबाग परिसरात लावण्यात आली होती. दरम्यान बसमध्ये चावी असल्याचे पाहून चोरट्याने चक्क बस पळवून नेली. मार्केट यार्ड परिसरात बस सोडून चोरटा पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या वेळी चोरट्याने बसमधील पाच हजारांची बॅटरी चोरून नेल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पीएमपीच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीएमपीच्या स्वारगेट आगारातून धावणार्‍या बस, फेरीनंतर चालक लष्कर भागातील पूलगेट स्थानकात लावतात. काही बस स्वारगेट भागात लावण्यात येतात. पीएमपी बस लावण्यास जागा अपुरी पडत असल्याने बस वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येतात. पालखी सोहळ्यामुळे लष्कर भागातील पूलगेट स्थानकात बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने एका चालकाने रात्री बस सारसबाग परिसरातील सणस मैदान परिसरात लावली होती.

चावी बसमध्ये होती. चोरट्याने बसमध्ये चावी असल्याचे पाहून मध्यरात्री बस पळवून नेली.पीएमपी बस मार्केट यार्ड आगाराच्या परिसरात बस लावून चोरटा पसार झाला. पसार झालेल्या चोरट्याने बसमधील बॅटरी चोरून नेली. दरम्यान, बस चोरीस गेल्याचे बुधवारी (14 जून) लक्षात आल्यानंतर शोध घेण्यात आला. तेव्हा बस मार्केट यार्ड आगाराजवळ लावण्यात आल्याचे आढळून आले. चोरट्यांनी या भागातील दोन बसच्या काचाही फोडल्याचे आढळून आले आहे. पीएमपीतील सुरक्षा अधिकार्‍यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस कर्मचारी सिताप तपास करत आहेत.

हे ही वाचा  :

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संनियंत्रण समिती घोषित करा : छगन भुजबळ यांची मागणी

पुणे : ‘पिन’ मिळवत मोलकरणीने ज्येष्ठ महिलेच्या एटीएममधून काढले पाच लाख

Back to top button