जागतिक वृद्ध अत्याचारविरोधी जागृती दिन : ज्येष्ठ महिलांचा कुटुंबातच छळ ! | पुढारी

जागतिक वृद्ध अत्याचारविरोधी जागृती दिन : ज्येष्ठ महिलांचा कुटुंबातच छळ !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भारतातील वृद्ध स्त्रियांना सामाजिक, आर्थिक आणि डिजिटलपातळीवर दुय्यम वागणूक मिळते, तसेच त्यांना मुलांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे त्यांच्या छळात वाढ झाली आहे, असा निष्कर्ष ‘हेल्पेज इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. या सर्वेक्षणात देशभरातील 7911 महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यापैकी राज्यातील 57 टक्के वृद्ध स्त्रियांनी कुटुंबाकडून छळ होत असल्याचे मान्य केले.
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 15 जून रोजी ‘वर्ल्ड एल्डर अ‍ॅब्यूज अवेअरनेस’ दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने राष्ट्रीय पातळीवर अहवाल सादर करण्यात आला आहे. ’वुमन अँड एजिंग – इनव्हिजिबल ऑर एम्पॉवर्ड’ असे या अहवालाचे नाव आहे. 20 राज्ये, 2 केंद्रशासित प्रदेश आणि 5 मोठ्या शहरांतील ग्रामीण व शहरी वृद्ध  महिलांकडून माहिती घेण्यात आली आहे. वृद्धांचा छळ, भेदभाव, आर्थिक स्रोत उपलब्ध असणे, रोजगार आणि रोजगारक्षमता, आरोग्यसेवा, सामाजिक व डिजिटल समावेशकता, सुरक्षा, जागरूकता, तक्रारनिवारण अशा विविध मुद्द्यांना अहवालात स्पर्श करण्यात आला आहे.
वृद्ध स्त्रियांचा होणारा छळ 16 टक्क्यांनी वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दर्जाहीन वागणूक (46 टक्के) आणि मानसिक/शारीरिक छळ (40 टक्के) यांचा यात समावेश असल्याचे दिसून आले. छळ करणार्‍यांमध्ये मुलांचे प्रमाण जास्त (40 टक्के) आहे, तर त्याखालोखाल इतर नातेवाइकांकडून होणारा छळ (31 टक्के) व सुनेकडून होणारा छळ (27 टक्के) दिसून येत आहे.फ
काय आहेत उपाययोजना ? 
अर्थपूर्ण रोजगाराचे महत्त्व वाढवायला हवे तसेच क्षमता विकसित करायला हवी. कामाच्या ठिकाणचे वातावरण वृद्धांसाठी पूरक हवे.
वृद्ध स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्याविषयी जागरूकता निर्माण करणे.
वृद्ध स्त्रियांसाठी डिजिटल प्रशिक्षण कार्यशाळा घेणे.
वृद्ध स्त्रियांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता तयार करणे.
वृद्ध स्त्रियांसाठी असलेल्या सरकारी योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी करणे
मुंबईमध्ये 61 टक्के वृद्ध स्त्रियांकडे कोणत्या तरी स्वरूपाची मालमत्ता आहे, तर 39 टक्के स्त्रियांकडे कोणत्याच स्वरूपाची मालमत्ता नाही.
85 टक्के स्त्रिया कोणत्याच प्रकारचे काम करीत नाहीत, तर 13 टक्के स्त्रिया पूर्ण किंवा अर्धवेळ काम करतात.
57 टक्के वृद्ध स्त्रिया समाजात वृद्धांचा शारीरिक हिंसेसह छळ होत असल्याचे मान्य करतात, तर 14 टक्के स्त्रियांनी स्वतः हा छळ अनुभवला आहे. मुलगा, सून आणि इतर नातेवाइकांकडून असा छळ केला जात असल्याचे यात दिसून आले आहे.
डिजिटल समावेशकतेबद्दल वृद्ध स्त्रिया खूपच मागे आहेत. 60 टक्के वृद्ध स्त्रियांनी कधीच डिजिटल उपकरणे वापरलेली नाहीत, तर 59 टक्के वृद्ध स्त्रियांकडे स्मार्टफोन नाहीत. 13 टक्के वृद्ध स्त्रियांनी ऑनलाइन कौशल्यविकास प्रोग्रॅममध्ये सहभागी व्हायला आवडेल, असे सांगितले.
48 टक्के वृद्ध स्त्रियांना किमान एकतरी गंभीर आजार आहे, तरी 64 टक्के वृद्ध स्त्रियांनी आरोग्य विमा नसल्याचे सांगितले.
लहान वयापासूनच स्त्रियांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक भेदभाव सहन करावे लागतात व त्याचे अतिशय दुर्दैवी परिणाम त्यांना वृद्धापकाळात भोगावे लागतात. वृद्धापकाळात त्यांच्याकडे अतिशय कमी सामाजिक सुरक्षा असते किंवा पूर्णपणे नसते. आपल्या आयुष्याचे सर्व निर्णय घेणार्‍या आपल्या जोडीदाराच्या निधनानंतर या स्त्रियांना कसे स्वावलंबी होता येईल, त्यासाठी त्यांना कसे प्रोत्साहन देता येईल, याविषयी आपण नव्याने विचार करायला हवा. –
                                                               -अनुपमा दत्ता,  पॉलिसी आणि रिसर्च विभागप्रमुख, हेल्पेज इंडिया 
हे ही वाचा  :

Back to top button