पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील प्रत्येक वर्गात आता ग्रंथालय | पुढारी

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील प्रत्येक वर्गात आता ग्रंथालय

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील प्रत्येक वर्गात ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे. त्या ग्रंथालयात अभ्यासक्रमाशिवाय महापुरुषांचे चरित्र, प्रसिद्ध साहित्य, ग्रंथ, कादंबर्‍या, प्रेरणादायी पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या प्राथमिक 138 शाळा आणि माध्यमिक 18 शाळा आहेत.

त्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत सुमारे 58 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणून प्रत्येक वर्गात ग्रंथालय सुरू करण्यात येत आहे. त्या ग्रंथालयात अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर वाचनीय पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना दिवसभरात केव्हाही ती पुस्तके वाचता येणार आहेत. हे ग्रंथालय शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थीच चालविणार आहेत.

त्यासाठी लोखंडी कपाटे व बुककेस खरेदी करण्यात येणार आहे. एक कपाट 10 हजार 719 रुपयांचे आहे. असे एकूण 677 कपाटे खरेदी करण्यात येणार आहे. एकूण 72 लाख 56 हजार 763 इतका खर्च आहे. हा दर 33.83 टक्के इतका कमी आहे. ही कपाटे सांगवी येथील इंद्रनिल टेक्नॉलॉजीकडून खरेदी केले जाणार आहेत. या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.

विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला इंग्रजी भाषेतील अंक

विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी एका संस्थेकडून इंग्रजी भाषेतील साप्ताहिक अंक खरेदी करण्यात येणार आहे. एकूण 8 माध्यमिक शाळांमध्ये हे साप्ताहिक दिले जाणार आहे. एका साप्ताहिकाची किंमत 23 रुपये असून, दोन विद्यार्थ्यांना एक याप्रमाणे 4 हजार 188 विद्यार्थ्यांना 3 महिन्यांतील 11 आठवडे हे साप्ताहिक दिले जाणार आहे. त्यासाठी 5 लाख 29 हजार 782 खर्च करण्यात येणार आहे.

एकूण 8 प्राथमिक शाळेतही इंग्रजी भाषेतील साप्ताहिक अंक दिला जाणार आहे. त्याची किंमत 8 रुपये 50 पैसे आहे. दोन विद्यार्थ्यांना एक अंक दिला जाणार आहे. तीन हजार 656 विद्यार्थ्यांना एकूण 1 हजार 828 अंक 11 आठवडे दिले जाणार आहेत. त्यासाठी 1 लाख 70 हजार 918 खर्च करण्यात येणार आहे. असा एकूण 7 लाख खर्च करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविणार

विद्यार्थ्यांचे वाचन वाढावे, त्यांना पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर ज्ञान मिळावे म्हणून वर्गात ग्रंथालय सुरू करण्याची नवीन संकल्पना राबविण्यात येत आहे. वर्गात ग्रंथालय असल्याने तसेच, सहज पुस्तके उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होणार आहे. त्या माध्यमातून शाळेचा दर्जा वाढविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

हेही वाचा

धक्कादायक ! पहिल्याच दिवशी फी साठी विद्यार्थ्यांना हाकलले शाळेबाहेर

मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वरील अपघातात आणखी एकाचा मृत्यू

पिंपरी : थकबाकीदारांच्या मिळकत जप्तीची कारवाई सुरू करणार

Back to top button