मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वरील अपघातात आणखी एकाचा मृत्यू | पुढारी

मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वरील अपघातात आणखी एकाचा मृत्यू

लोणावळा (पुणे) : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा शहरातील कुणेगाव पुलावर मंगळवारी (दि. 13) झालेल्या टँकर अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ झाली असून, ही संख्या पाचवर पोहोचली आहे. इथेनॉल हे केमिकल घेऊन जाणार्‍या टँकरला अपघात होऊन लागलेल्या आगीत मंगळवारी 4 जण मृत झाले होते, तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. या जखमींमधील एकाचा बुधवारी मृत्यू झाला.
गणेश एकनाथ कोळसकर (वय 39, रा. अंधेरी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

मंगळवारी सकाळी 11.30 वाजता हा अपघात झाला होता. मात्र, त्यानंतर उशिरापर्यंत स्थानिक मृत आणि जखमींची नावे वगळता या अपघातग्रस्त टँकरविषयी तसेच, त्यात प्रवास करणार्‍या मृत आणि जखमी व्यक्तींविषयी पोलिसांना रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त झाली नव्हती. मात्र, पोलिसांनी एक्सप्रेस हायवेच्या टोलनाक्याचे सीसीटीव्ही तपासून या टँकरचा क्रमांक मिळविला. या अपघातग्रस्त टँकरचा क्रमांक (एम. एच. 42 बी. एफ. 9979) असून, नितीन सुखदेव सत्रे (वय 32, रा. मोगराळे, ता. मान, जि. सातारा) हा या टँकरचा चालक असल्याचे समोर आले आहे.

टँकरचालक हा गंभीर जखमी असून, त्याच्याशिवाय टँकरमधील दुसरा प्रवासी चंद्रकांत आप्पा गुरव (वय 49, रा. धनकवडी, पुणे) आणि इनोव्हाचालक गणेश एकनाथ कोळसकर (वय 39, रा. अंधेरी) हे दोघेदेखील गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी इनोव्हाचालक गणेश कोळसकर यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय मंगळवारी टँकरमध्ये होरपळून मृत झालेल्या एका अनोळखी व्यक्तीची ओळख मिळाली असून, जनार्दन बापूराव जाधव (वय 60, रा. घाटकोपर) असे त्यांचे नाव आहे.

टँकरला लागलेल्या भीषण आगीमध्ये टँकरसह टँकर मार्गावरून बाजूला करण्यासाठी बोलवण्यात आलेला एक क्रेन, तसेच पुलाखालील रस्त्यावरून जाणारी एक दुचाकी याशिवाय पुलाखाली उभ्या असलेले दोन टेम्पो डंपर, एक मोपेड दुचाकी आणि एक इनोव्हा अशा तब्बल सात गाड्या जळून खाक झाल्या होत्या. तसेच, पुलाखालील एक चहाची टपरीदेखील जळून गेली होती. यातील पुलाखालून जात असलेल्या दुचाकीवरील तीनजण आणि पुलाखालील उभ्या असलेल्या इनोव्हाचा चालक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा

पुणे : शाळांची घंटा आज वाजणार !

पिंपरी : थकबाकीदारांच्या मिळकत जप्तीची कारवाई सुरू करणार

पिंपरी : पीएमआरडीएचा विकास आराखडा आणखी लांबणीवर

Back to top button