पुणे : नळ योजनांची 155 कामे लटकली ; ‘जलजीवन’मध्ये ठेकेदारांना नोटिसा

पुणे : नळ योजनांची 155 कामे लटकली ; ‘जलजीवन’मध्ये ठेकेदारांना नोटिसा

दिगंबर दराडे : 

पुणे : काम करण्याची ऐपत नसताना सहकार्याच्या नावाखाली खंडीभर कामांचे कंत्राटे घेणारे आता अडचणीत आले आहेत. पुणे जिल्ह्यातील कामे सुरू न केल्याने तब्बल 155 ठेकेदारांना नोटिसा बजविण्यात आलेल्या आहेत. समाविष्ट गावांसाठी 1226 नळयोजना मंजूर झाल्या आहेत. 155 ठेकेदारांनी अद्याप कामच सुुरू न केल्याने योजनांच्या निविदाही निघाल्या नसल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांनी दिली. अनेक ठेकेदारांनी कामे सुरू न केल्याने नागरिक तक्रारी करीत आहेत. काहींनी केवळ काम सुरू करण्याची औपचारिकता पूर्ण करून पुढे त्या कामाच्या ठिकाणी ढुंकूनही पाहायला तयार नसल्याचेही वास्तव पाहायला मिळत आहे.

आता जसजशी कामे सुरू होत आहेत, तशा तक्रारीही येत आहेत. योग्य खोलीवर पाइप न टाकणे, जलस्रोत अंतिम नसताना पाइपलाइन टाकणे, आधी एका ठिकाणी व आता नव्या ठिकाणी स्रोताची मागणी करणे, आदी अनेक तक्रारी येत आहेत. केंद्र शासनाने पुढील तीस वर्षांचे नियोजन करून एकही गाव नळयोजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यास बजावले आहे, शिवाय ज्या गावांत आधीच योजना आहे, त्यांचेही बळकटीकरण करून प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचण्याचा संकल्प केला आहे.

साधारणपणे पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देणे शक्य आहे. मुख्य स्रोत विहीर असल्यास खोदकाम करणे, बांधकाम करणे, पुरेसे पाणी लागल्यास त्या ठिकाणावरून गावानजीकच्या टाकीपर्यंत आणणे आदी कामे करावी लागतात. मात्र, उन्हाळ्यातच जलवाहिनीची बहुतांश कामे सुरू करण्याच्या नोटिसा दिल्यानंतर बहुतांश कंत्राटदारांनी कामे सुरू केली असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जे ठेकेदार टाळाटाळ करतील, अशांवर कारवाईचे हत्यार उपसण्यात येईल. जी कामे सुरू आहेत, त्यात काही तक्रार असल्यास त्याचे निरसन केले जात असून, ठेकेदारांच्याकडून सुधारणा करून घेतली जात असल्याचेही सांगण्यात आले. अनेकांनी कामेच सुरू करण्यास टाळाटाळ केली. यापूर्वी जलजीवन मिशनमध्ये डोळे झाकून काम करण्याच्या पद्धतीत कोलॅब्रेशनच्या नावाखाली अनेक किरकोळ ठेकेदारांनाही कामे दिली. तर काही मोठ्या गुत्तेदारांनीही त्यांच्या आवाक्यापेक्षा जास्त कामे घेतल्याने त्यांचीही अडचण होऊन बसली आहे. एकूण 1900 कोटी रुपयांच्या एवढ्या योजना एकाच वेळी चालू झाल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news