Ashadhi wari 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! खानदेश, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जातात वारकरी | पुढारी

Ashadhi wari 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! खानदेश, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जातात वारकरी

रुईछत्तीशी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : नगर-सोलापूर मार्गावरून आज पंढरीच्या दिशेने जाणार्‍या दिंड्या पाऊले टाकणार आहेत. आषाढी एकादशीच्या 15 दिवस अगोदर या मार्गावरून वारकरी चालत जातात. खानदेश, नाशिक, छत्र संभाजीनगर परिसरातील वारकरी या मार्गावरून प्रवास करतात. यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने वारकर्‍यांची संख्या ही जास्त असणार आहे. नगर-सोलापूर मार्गाचे काम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले असून, वारकर्‍यांना चालण्यासाठी हा रस्ता सोयीचा झाला आहे. यामुळे यंदा वारी मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. सोलापूर मार्गावरून जवळपास 50 टक्के वारकरी पंढरीला जातात.

निवृत्तीनाथ, मुक्ताई, सरालाबेट, ताहाराबाद या मानाच्या दिंड्या याच मार्गावरून जात असल्याने भक्तांची संख्या ही मोठी आहे. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करत चाललेल्या दिंड्या 10 ते 12 दिवस या मार्गावर धार्मिक वातावरण तयार करतात. यामुळे नगर-सोलापूर महामार्ग या काळात भगवामय होऊन जातो. निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी साकत येथे मुक्कामी असते. या पालखीमध्ये रस्त्यावरील गावांमध्ये पाण्याची आणि नाशत्याची सोय केलेली जाते. उन्हामुळे वारकरी शाळा, महाविद्यालयात आसरा घेतात. मार्गावरील भक्तगण वारकर्‍यांची मनोभावे सेवा करतात. आजपासून सुरु झालेली पंढरीची वारी विठूनामाचा जयघोष करत आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात विठ्ठल – रुक्मिणीचे दर्शन घेते.

रुईछत्तीशी येथे सर्वाधिक दिंड्या मुक्कमी..
येथे सर्वाधिक दिंड्या मुक्कामी असतात. शाळा, महाविद्यालये मोठी असल्याने वारकर्‍यांना राहण्याची चांगली सोय होते. गावही मोठे असल्याने वारकर्‍यांना ग्रामस्थ राहण्यासाठी आसरा देतात. अनेक वर्षांपासून रुईछत्तीशी वारकर्‍यांचे मुक्कामाचे गाव ठरले आहे.

Back to top button