खेड तालुक्यात भात खाचरांच्या पूर्वमशागतीला वेग | पुढारी

खेड तालुक्यात भात खाचरांच्या पूर्वमशागतीला वेग

कडूस(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिमपट्ट्यात विशेषतः सह्याद्रीच्या डोंगररांगावर काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी बरसल्या. परिणामी, भात उत्पादक क्षेत्रात खाचरांच्या पूर्वमशागतींना वेग आला आहे. भातरोपे तयार करण्यासाठी धूळवाफेवर भात बियाणे टाकण्यात शेतकरी गुंतला आहे. औदर, देओशी, कुडे, खरपुड, येणिये, वाजवणे, पाळू, विशेषतः भामनेर व भीमनेर खो-यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भात खाचरे तुडुंब भरून गेली होती.

आठवडाभर मान्सूनचे आगमन लांबल्याने मृग नक्षत्रात यंदा पेरण्या होणार नसल्याचे संकेत मिळाल्याने शेतक-यांमध्ये नाराजी आहे. जमिनीतील ओल कमी झाल्याने पश्चिम भागात सध्या पूर्वमशागतींना वेग आला आहे. ट्रॅक्टर, बैलाच्या साहाय्याने नांगरणी, खाचरातील गवत, पालापाचोळा वेचण्याची कामे सुरू आहेत. धूळवाफेवर बियाणे टाकून भातरोपे तयार करण्याची लगबग दिसत आहे.

आठवड्यापूर्वी टाकलेल्या बियाण्यांपासून भात रोपे उगवून आली. मात्र, पावसाचे आगमन रखडल्याने ही रोपे उन्हाच्या चटक्याने मरगळू लागली आहेत. तालुक्याच्या उर्वरित भागांत पुरेसा पाऊस न पडल्यामुळे पूर्वमशागतीच्या कामांना ब—ेक लागला आहे. शेतकरी पावसाची चातकासारखा वाट पाहात आहे. कोकणात मान्सूनचे आगमन झाल्याची वर्दी आल्याने शेतकरीवर्गाला काहीसा दिलासा मिळू लागला असला, तरी म्हणावे असे पावसाळी वातावरण तयार झालेले नाही. मात्र, उष्णतेत ब-याच अंशी घट झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

हेही वाचा

Ashadhi wari 2023 : पोलीस बांधवांसाठी पुनीत बालन ग्रुपकडून ५ हजार किट

पिंपळनेर: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ; बाल सुधार कारागृहात रवानगी

Back to top button