शालेय साहित्य खरेदीसाठी लगबग; आळेफाटा परिसरातील चित्र | पुढारी

शालेय साहित्य खरेदीसाठी लगबग; आळेफाटा परिसरातील चित्र

आळेफाटा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : विविध प्रकारच्या शालेय साहित्य खरेदीला दुकानांमध्ये गर्दी होत आहे. त्यातच थ्रीडी कार्टूनचे चित्र असलेली स्कूल बॅग, छोटा भीम, डोरेमॉन यांच्यासोबतच सेलिब्रेटींचे चित्र असलेले नोटबुक, पेन्सिलसोबतच जम्बो खोडरबर, शार्पनर अशा विविध साहित्यांनी भरलेली कंपासपेटी, वेगवेगळ्या शाळांचे गणवेश, नवीन बूट, टाय असे नवनवीन शालेय साहित्य खरेदीसाठी बच्चे कंपनीला सोबत घेऊन पालकांची लगबग सुरू असल्याचे चित्र सर्वत्र आहे.

राज्यातील सर्व शाळा 15 जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे शालेय साहित्यांची दुकाने गजबजून गेले आहेत. शाळेचा पहिला दिवस जवळ आल्यामुळे ऐनवेळेस घाई नको म्हणून पालक आतापासूनच पाल्यांसाठी वह्या, पुस्तके, दप्तर, कंपास, बूट, रेनकोट, छत्री, बॅग, कंपास घेण्यासाठी दुकानांमध्ये शालेय साहित्य घेण्यासाठी जात आहे.

विद्यार्थी नोटबुक खरेदी करताना क्रिकेटपटू, चित्रपट कलाकार यांचे चित्र असलेल्या नोटबुकपेक्षा निसर्गचित्र असलेल्या नोटबुकला पसंती देत आहे. बच्चे कंपनीचा ओढा मात्र कार्टून चित्र यांच्याकडे आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध रंगांच्या, आकाराच्या बॅग्ज बाजारात
आल्या आहेत. स्कूल बॅगप्रमाणेच यंदा कार्टूनचे चित्र असणारे प्लॅस्टिक कंपास बॉक्स बाजारात उपलब्ध असून, त्याची किंमत 30 ते 350 रुपयांपर्यंत आहे.

स्कूल बॅगचे आकर्षण

मोटू-पतलू, छोटा भीम, स्पायडर मॅन, बेनटेन, पॉकिमन, बार्बी, डोरेमॉन, अँग्री बर्डस् अशी विविध चित्रे असलेल्या स्कूल बॅगला बच्चे कंपनीची सर्वात जास्त पसंती आहे. या स्कूल बॅगच्या किमती 150 ते 600 रुपयांच्या दरम्यान आहेत.

साहित्याच्या किमतीत 40 टक्के वाढ

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शालेय साहित्यांच्या किमतीमध्ये 30 ते 40 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एका वहीमागे 7, 10, 15, 20 असा फरक पडला आहे. गेल्यावर्षी शंभर पानी वही 150 रुपये डझन होती. ती सध्या 270 ते 280 रुपये डझन, 200 पानी वही 300 रुपये डझनची आता 450 रुपये डझन, फुलस्केप पानी वही 400 रुपये डझन होती ती 540 रुपये, अशा दराने उपलब्ध आहेत.

हेही वाचा

आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच, शालेय डीबीटी रखडली

पिंपरी : शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी

नाशिक : घराला पाणी मारत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

Back to top button