पिंपरी : शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी | पुढारी

पिंपरी : शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सर्व शाळा 15 जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठा शालेय साहित्यांनी गजबजून गेल्या आहेत. पालकांना पुढील एक आठवडा शालेय साहित्य खरेदीसाठी मिळणार आहे. मात्र, ऐनवेळेस घाई नको म्हणून पालक आत्तापासून खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. वह्या, दप्तर, कंपास, बूट, रेनकोट, छत्री, गणवेश आदी खरेदीस पालकांची गर्दी दिसून येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात वह्यांच्या किंमती वाढल्या आहेत. शंभर पानी वही सध्या 280 ते 300 रुपये डझन फुलस्केप 400 पानी 600 रुपये डझन अशा दराने विक्रीस उपलब्ध आहेत. मुलांच्या आवडीनुसार कार्टून, गाड्यांची चित्रे, खेळाडूंचे फोटो यांची चित्रे वह्यांवर दिसत आहेत.

कार्टून्सच्या आकर्षक बॅग्स्
लहान मुलांना आवडतील अशा आकर्षक रंगांच्या, कार्टून्सचे कव्हर असलेल्या वह्या, दप्तर, वॉटर बॅग, कंपास उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध रंगांच्या व आकाराच्या बॅग्ज बाजारात आल्या आहेत. यावर कार्टून्सची चित्रे, बार्बी डॉल, अँग्री बर्ड, स्पायडर मॅन, बेनटेन, डोरा, डोरेमॉन यांची चित्रे असलेल्या बॅगांना मुलांची जास्ती पसंती मिळते. या बॅगा 300 ते दीड हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच टिफीनसाठीदेखील विविध प्रकारच्या आकर्षक बॅग विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. यावरदेखील इतर बॅगप्रमाणे कार्टून्सची छाप पडलेली दिसून येत आहे. यांच्या किंमतीही 150 पासून ते 500 रुपयांपर्यंत आहे. वॉटरबॅग आणि वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या बॉटल्स यांची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे

Back to top button