बारामती लोकसभेला ताकदीसाठी अध्यक्षपद वेल्ह्याकडे | पुढारी

बारामती लोकसभेला ताकदीसाठी अध्यक्षपद वेल्ह्याकडे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसने वेल्हा तालुक्यातील ज्येष्ठ संचालक भगवान पासलकर यांची वर्णी लावली. यानिमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मतदानाच्या रूपाने अधिक ताकद मिळण्यासाठी आणि कात्रज दूध संघाची आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी अनुभवी संचालकांना प्राधान्य देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

अध्यक्षपदाची निवडणूक लागल्यानंतर 16 पैकी 10 संचालकांनी दबाव गट करून अध्यक्षपद खेचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. एवढेच नाही, तर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत संचालक मंडळातील 16 पैकी 7 संचालकांनी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी ज्येष्ठांसह प्रथमच निवडून आलेल्या नवतरुण संचालकांमध्येच चुरस दिसून आली.

सोमवारी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सकाळी कात्रजच्या मुख्यालयात येऊन पक्षश्रेष्ठींनी बंद पाकिटातून दिलेले नाव संचालकांसमोर अगोदरच स्पष्ट केले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन अध्यक्षपदी तिसर्‍यांदा निवडून आलेले संचालक पासलकर यांची वर्णी लावण्यात आली. तसेच, संघावर प्रथमच निवडून आलेल्या संचालकांना ‘वेट अँड वॉच’ अशीच भूमिका ठेवण्याचा संदेशही यानिमित्ताने पक्षश्रेष्ठींकडून दिला गेला आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (PDDC) अध्यक्षपद हे पुरंदरमधील प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्याकडे असून, त्यानुसार
जिल्हास्तरावरील कात्रज दूध डेअरीचे महत्त्वाचे अध्यक्षपद वेल्हा तालुक्यास देऊन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाला फायदा होईल, असे गणित मांडूनच हा निर्णय झाला. दरम्यान, आजच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भोरमधील संचालक दिलीप थोपटे अनुपस्थित राहिल्याची चर्चा होती.

कुरघोड्या, गटबाजीला थारा नाही

अध्यक्ष निवडीनंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी झालेल्या सत्कार प्रसंगी पक्षाची ध्येयधोरणे सांगत कात्रजच्या संचालकांमधील 10 संचालक एकीकडे आणि उर्वरित एकीकडे, अशी गटबाजी आणि अंतर्गत कुरघोड्या आता पक्षस्तरावर खपवून घेतल्या जाणार नसल्याची तंबी सर्वांना दिली. तसेच, दूध उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देताना सर्वांनी एकदिलाने काम करावे. दरम्यान, आतातरी ‘कात्रज’चा कारभार संचालकांमधील ’टीम वर्क’द्वारे सुरळीत चालून आर्थिक विकासाची गंगा दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या घराघरांत पोहचावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा

ITI Online Admission : ‘आयटीआय’ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

डॉ. अनिल रामोड प्रकरण : 2 हजारांच्या नोटाही जमा झाल्या सरकारी तिजोरीत!

कोल्हापूर : तपोवन मैदानावर आज ‘शासन आपल्या दारी’; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Back to top button