कोल्हापूर : तपोवन मैदानावर आज ‘शासन आपल्या दारी’; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती | पुढारी

कोल्हापूर : तपोवन मैदानावर आज ‘शासन आपल्या दारी’; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्हास्तरावरील कार्यक्रम मंगळवारी (दि. 13) दुपारी चार वाजता तपोवन मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार्‍या या कार्यक्रमाला 30 हजारांहून अधिक लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ, विविध मंजुरीची पत्रे, वस्तू आदींचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील 1227 गावांमधून 28 हजार 640 लाभार्थी 716 बसमधून आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी बहुपीक मळणी यंत्र, शेंगा फोडणी यंत्र, डिझेल पंप, स्प्रे पंप, ट्रॅम्पोलीन, शिलाई यंत्र, वॉशिंग मशिन, व्हिलचेअर, लेबर सेफ्टी किट, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, पॉवर विडर आदी साहित्याचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे.

तपोवन मैदानावर सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात तपासणीनंतर मोफत औषध वाटप केले जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचेही आयोजन केले आहे. या मेळाव्यात 1800 हून अधिक रिक्त पदांसाठी 18 कंपन्या सहभागी होणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांना बसेसद्वारे कार्यक्रम स्थळी आणणे, पुन्हा त्यांच्या गावी पोहोचवणे, त्यांना पाणी, ओआरएस पॅकेट, नाश्ता व भोजन देण्यात येणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यासपीठ व्यवस्था, उपस्थित नागरिक, लाभार्थी, पत्रकार, मान्यवरांची बैठक व्यवस्था, शासकीय योजनांचा माहिती कक्ष, वैद्यकीय कक्ष आदी कक्ष तयार करण्याबरोबरच त्या-त्या कक्षांचे माहिती फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. या ठिकाणी पाणीपुरवठा, फिरते स्वच्छतागृह, रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. लाभार्थी व नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची माहिती देणारे बॅनरही विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत.

मुख्य कार्यक्रम मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Back to top button