Monsoon Updates : मान्सून कोकण, मराठवाड्यात 48 तासात हजेरी लावणार | पुढारी

Monsoon Updates : मान्सून कोकण, मराठवाड्यात 48 तासात हजेरी लावणार

पुणे : Monsoon Updates : मान्सूनची राज्यातील आगेकूच सुरूच आहे. पोषक वातावरणामुळे मान्सून पुढील 24 ते 48 तासांत मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागात प्रवेश करण्याची चिन्हे आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात हजेरी लावणार आहे. हा पाऊस 16 जूनपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी मान्सूनने कोकणचा आणखी काही भाग व्यापला. याशिवाय, कर्नाटक आणि तमिळनाडू व उर्वरित भागासह आंध्र प्रदेश, उत्तर पश्चिम बंगालचा काही भाग, उप हिमालयीन भाग, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम व बिहारच्या बहुतांश भागात मान्सून दाखल झालेला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली आहे. या चक्रीवादळाचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले असून, ते आता पूर्वमध्य अरबी समुद्रातून पुढे उत्तरेकडे सरकले आहे. 14 जूनला ते उत्तर सौराष्ट्र व कच्छ पार करून पाकिस्तानच्या किनारपट्टीजवळ पोहोचेल. गुजरातमधील मांदवी ते कराची दरम्यान या चक्रीवादळाची व्याप्ती असणार आहे. तर, 15 जूनपासून या चक्रीवादळाची तीव्रता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल आणि 16 जूनला या चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. (Monsoon Updates)

तथापि, राज्यातील काही भागांतील कमाल तापमानाचा पारा कमी होण्याची शक्यता आहे. सोमवारी वर्धा येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजेच 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र, उर्वरित शहरांचा कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास आहे.

हे ही वाचा :

मान्सून कोकणात दाखल

Monsoon Update : खूशखबर! मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन

Back to top button