पुणे : भाजप शहराध्यक्षपदाची निवड पुन्हा लांबणीवर | पुढारी

पुणे : भाजप शहराध्यक्षपदाची निवड पुन्हा लांबणीवर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदाची निवड पुन्हा लांबणीवर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळानिमित्ताने सुरू असलेले महा जनसंपर्क अभियान पूर्ण होईपर्यंत राज्यातील सर्वच विद्यमान शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना बदलू नयेत, असे आदेश वरिष्ठ पातळीवरूनच आले आहेत. त्यामुळे तूर्तास ही प्रक्रिया रखडली आहे.

पुण्यासह राज्यातील अनेक शहरांचे आणि जिल्ह्यांचे अध्यक्ष यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यानुसार भाजपकडून नव्याने या पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मे महिनाअखेरीस सर्व राज्यातील जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, ही प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. पंतप्रधान मोदी सरकारने 30 मे रोजी नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.

त्यानिमित्ताने मोदी -9 या उपक्रमांतर्गत राज्यभर महा जनसंपर्क अभियान, तसेच विविध उपक्रम सुरू आहेत. हे उपक्रम 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलल्यास त्याचा थेट परिणाम या अभियानावर आणि सुरू असलेल्या उपक्रमावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रातूनच या कालावधीत या निवडी करू नयेत, असे आदेश देण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुण्यासह सर्वच ठिकाणच्या शहराध्यक्षपदाची निवडप्रक्रिया रखडली आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यात या निवडी होतील, असेही या सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

नगर : पारनेर तहसीलमध्ये होणार प्रांताधिकारी दालन ; खासदार डॉ. सुजय विखे

पुणे : जिल्हा प्रशासनात ‘जो जे वांछिल तो ते लाहो’; बदल्यांचा देशमुख पॅटर्न

Back to top button