

श्रीगोंदा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : आढळगाव फाटा ते हिरडगाव फाटा या रस्त्यावर रविवारी (दि. 11) सकाळी झालेल्या एका अपघातात शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के जखमी झाले. त्यांच्यावर श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या रस्त्यावरील अपघातांची मालिका थांबायला तयार नसून, या अपघातांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार हेच जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आढळगाव फाटा ते हिरडगाव फाटा या दरम्यान नवीन झालेल्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी पाच वाहनांचे अपघात होऊन पाच जण जखमी झाले होते. ही बाब संबंधित विभागाच्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली; मात्र त्यांनी कानाडोळा केला. रविवारी सकाळी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के चांडगाव येथून आढळगाव येथे दशक्रिया विधीला जात होते. याच नवीन रस्त्यावर त्यांची कार रस्त्याच्या कडेला उलटली. म्हस्के स्वतः गाडी चालवत असल्याने या अपघातात ते जखमी झाले. रस्त्याने जाणार्या प्रवाशांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात म्हस्के यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
रोज होणारे अपघात लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कामात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतील का, हा खरा प्रश्न आहे.
अधिकारी ठेकेदारच जबाबदार
याबाबत प्रमोद म्हस्के म्हणाले, या रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या खडीवरून घसरून वाहने पलटी होत आहेत. निकृष्ट काम अन् ठेकेदार यांना अधिकारी पाठीशी घालत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी आमची मागणी आहे.
टक्केवारीमुळेच असे प्रकार
माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, जी कामे चालू आहेत, ती टक्केवारी घेऊन सुरू आहेत. त्यामुळे अधिकारी व ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत आहेत. कुठल्याही कामाचा दर्जा राखला जात नाही. रस्त्यामुळे अपघात होतात, याचे खंडन करणार्या अधिकारी व ठेकेदार यांनी या रस्त्यावरून गाडी चालवून दाखवावी.
सत्य समोर आले पाहिजे
भाजप नेते बाळासाहेब महाडिक म्हणाले, एकाच ठिकाणी सहा अपघात होत असतील तर, ही बाब नक्कीच गंभीर आहे. अपघात कशामुळे झाले याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
हे ही वाचा :