समीर भुजबळ
वाल्हे (पुणे) : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गासंदर्भात 'दैनिक पुढारी' ने मागील आठवड्यात 'पालखी मार्ग मृत्यूचा सापळा' ही लेखमालिका केली होती. मालिकेतून पुरंदर तालुक्यातून जाणार्या पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची विस्तृत माहिती दिली होती. मात्र, अद्यापही पालखी महामार्गावर अपघातांच्या मालिका सुरूच आहेत.
पालखी महामार्ग मृत्यूचे सापळे, भाग- 3 मध्ये,'जेजुरीत महामार्गाचा रुंद- अरुंद खेळ' अशा आशयाचे वृत्त मंगळवारी (दि.6) जुन्या जेजुरीहून- निरा दिशेकडे जाताना पालखी महामार्गावर असलेले अरुंद पूल व त्यापुढे लगेच रस्ता 'रुंद – अरुंद' होत असल्याचा फोटो प्रसिद्ध केला होता. दरम्यान, गुरुवारी (दि.8) याच ठिकाणी एका भरधाव चारचाकी वाहनाने एका दुचाकीस जोरदार धडक दिल्याने, दुचाकीवरील महिलेला जीव गमवावा लागला.
त्यानंतर राज्याचे महसूलमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी रस्त्याची व पालखी तळाची पाहणी केली होती. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनीही शुक्रवारी (दि.9) याच पालखी महामार्गाचा व पालखी तळाचा पाहणी दौरा केला होता. दौर्याच्या दुसर्याच दिवशी जेजुरी औद्योगिक वसाहतीपुढे भोरवाडी फाटा येथील चौपदरी रस्ता अचानक दुपदरी होतो. याच ठिकाणी एकाच दिवशी दोन भीषण अपघात झाले.
पहिल्या अपघातात अवघड वळणावर चारचाकी वाहन लोहमार्गावर जाऊन पडले. दुस-या अपघातात वारकर्यांना घेऊन जाणारी एसटी व कोंबड्याची वाहतूक करणारा पिकअप यांची धडक झाली. अपघातात जवळपास 23 प्रवासी जखमी झाले. पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहे. एकाच दिवशी सलग दोन अपघात झाले, सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही.
तसेच याच मार्गावर पुढे अत्यंत धोकेदायक अवघड वळणावर मागील 24 मे रोजी खाद्यपदार्थाची वाहतूक करणारा ट्रक अवघड वळणाचा अंदाज न आल्याने 15 फूट खोल असलेल्या लोहमार्गावर जाऊन पलटी झाला होता. सुदैवाने या वेळी या लोहमार्गावर रेल्वे नसल्याने, मोठा अपघात टळला होता. मात्र ट्रक ड्रायव्हर जखमी झाला होता.
दरम्यान, या धोकेदायक ठिकाणबाबत 'दैनिक पुढारी'ने अनेकवेळा वृत्तांकन करूनही कोणतीही खबरदारी घेण्याचे औदार्य सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवलेले नाही. पालखी सोहळ्यापूर्वी तकलादू कळकाचे खांब लावले जातील, त्यांना रेडियमही लावले जाईल. मात्र, पालखी परतीच्या प्रवासावेळी हे खांब नसतील. यानंतर बारा महिने पुणे – पंढरपूर पालखी मार्गावर दररोज किमान 40 एसटी बस धावतात. तसेच इतर एसटी बस 60 धावतात. वर्षभरात अनेक लहान- मोठे अपघात या मार्गावर होतात. यामध्ये अनेकांचे जीव गेलेत, अनेकजण कायमचे जायबंदी झालेत. हा पालखी महामार्ग मृत्यूचा सापळा तसाच ठेवण्यात बांधकाम विभागाला रस असावा, अशी चर्चा आता होत आहे.
हेही वाचा