कोल्हापूर, दिलीप भिसे : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायणी ज्वेलर्सवरील सशस्त्र दरोड्यात मध्य प्रदेशातील कुख्यात टोळीचा म्होरक्या पवनकुमार रामसेवक शर्मा (वय 35, रा. खाडीद, ता. गोरमी, जिल्हा भिंड) त्याच्यासह त्याचा विश्वासू साथीदार, शार्पशूटर छोटूचा सहभाग निष्पन्न झाला आहे. छोटूचे राजस्थानातील कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीशी कनेक्शन असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे विशेष पथक मध्य प्रदेशकडे रवाना झाल्याचेही समजते.
कुख्यात दरोडेखोर पवनकुमार शर्मासह त्याच्या टोळीविरुद्ध मध्य प्रदेश, बिहार, हरियाणासह अन्य राज्यांत दरोडे, जबरी चोरी व लुटमारीच्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. याच टोळीने 20 ऑक्टोबर 2021 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर (ता. आजरा) येथे अंदाधुंद गोळीबार करून सराफी व्यावसायिकाच्या हातातील दागिन्यांची बॅग हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
पवनकुमारला आजरा पोलिसांनी ठोकल्या होत्या बेड्या
यावेळी झालेल्या झटापटीत ज्वेलर्सचा मालकही जखमी झाला होता. दरोड्याच्या प्रयत्नानंतर दुचाकीवरून पळून जाणार्या दरोडेखोरांचा जमावाने पाठलाग केला होता. त्यावेळी जमावाने शर्माला पकडले होते, तर अन्य दोघेजण पसार झाले. या गुन्ह्यात आजरा पोलिसांनी टोळीचा म्होरक्या पवनकुमार शर्माला बेड्या ठोकल्या होत्या.
कळंबा कारागृहात झाली दोस्ती
या गुन्ह्यात शर्मासह टोळीतील साथीदारांची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तो साथीदारांसमवेत वर्षभर कारागृहात बंदिस्त होता. याच काळात अंबिका ज्वेलर्सचा मालक सतीश पोहाळकर व विशाल वरेकर यांची त्यांच्याशी दोस्ती जमली. कात्यायणी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकून दागिने लुटण्याचा प्रसंगी अंदाधुंद गोळीबार करण्याचा बेत त्यांच्यात कारागृहातच शिजला.
तिसरा स्थानिक संशयित पासार्डे परिसरातील
या दरोड्यात पोहाळकर, वरेकरसह आणखी एका स्थानिक संशयिताचा सहभाग निष्पन्न झाला आहे. पासार्डे (ता. करवीर) परिसरातील अंबाजी (वय 30) या संशयिताचे नाव पुढे आले आहे. तो पसार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. अंबाजी हा पोवाळकर व वरेकर यांचा विश्वासू सहकारी मानला जातो. परप्रांतीय दरोडेखोरांना हव्या त्या सुविधा पुरविण्याची त्याच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती.
छोटू शार्पशूटर… कुख्यात टोळीशी कनेक्शन
कात्यायणी ज्वेलर्सवरील दरोड्याचा थरार सुरू असताना दुकानाबाहेर येऊन नागरिकांच्या दिशेने गोळीबार करणारा छोटू हा मध्य प्रदेशात भिंड जिल्ह्यात अत्यंत घातकी दरोडेखोर व शार्पशूटर म्हणून कुख्यात आहे. राजस्थानातील कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीशी त्याचे कनेक्शन असल्याची चर्चा आहे.
म्होरक्याने छोटूला कोल्हापुरात बोलविले
टोळीचा म्होरक्या पवनकुमारचा विश्वासू साथीदार म्हणून गुन्हेगारी वर्तुळात छोटूची ओळख आहे. सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून दहशत माजविण्यात तो कुख्यात असल्याने पवनकुमारने त्याला कोल्हापुरात बोलावून घेतल्याचे समजते. पवनकुमार जेरबंद झाल्यानंतर टोळीचे आणखी कारनामे चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
विशाल वरेकर मूळचा उदगावचा
दरोड्यातील मुख्य संशयित विशाल धनाजी वरेकर हा मूळचा उदगाव (ता. शिरोळ) येथील आहे. 30 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आईने मुलगा विशालसह कोपार्डे (ता. करवीर) येथील माहेर गाठले. कोपार्डेतील नातेवाईकांनी त्याला आधार देऊन त्याचे लग्नही लावून दिले. त्याला दोन मुलेे आहेत. विशालच्या कारनाम्याने त्याच्या उदगाव व कोपार्डे येथील नातेवाईकांचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वीही त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. कारागृहात त्याची व पोहाळकरची दोस्ती झाली.