बारामती तालुक्यात पालखी सोहळा तयारीचा घेतला आढावा | पुढारी

बारामती तालुक्यात पालखी सोहळा तयारीचा घेतला आढावा

माळेगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील माळेगाव येथे संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा येत्या 20 जून रोजी मुक्कामी येणार आहे. या वेळी वारकर्‍यांना देण्यात येणार्‍या कोणत्याही सेवासुविधांमध्ये त्रुटी राहू नये, यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून नेमकी काय खबरदारी घेतली जाणार आहे? याबाबतचा आढावा तहसीलदार गणेश शिंदे यांनी घेतला. तर, पालखी सोहळ्यासाठी योग्य ती खबरदारी घेत वारकर्‍यांच्या सोईसुविधांबाबतची तयारी वेगात सुरू असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

तहसीलदार शिंदे यांनी माळेगाव नगरपंचायत कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधत माहिती घेतली. या वेळी गटविकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी स्मिता काळे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर सानप, भैरवनाथ उत्सव कमिटीचे धनवान वदक, अमित तावरे, बाबाराजे पैठणकर, भरत कदम, प्रताप सातपुते, प्रदीप कदम, महेश कदम, महेश लोणकर, दादा धोत्रे आदी उपस्थित होते.
पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने तयारी सुरू असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तसेच, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विहिरींतील पाण्याचे शुद्धीकरण केले जाणार आहे. हॉटेल व्यावसायिकांना स्वच्छता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सेवाभावी संस्थांना आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी आवाहन केले आहे, असे मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी सांगितले. तर पत्रकार व नागरिकांनी वीज, अर्धवट रस्ते, पाणी, आरोग्यविषयक काही सूचना केल्या. त्यावर तहसीलदार गणेश शिंदे यांनी ’रस्त्यासह इतर समस्या मार्गी लागतील. पालखी सोहळ्याची विशेष काळजी घेतली जाईल, असे सांगितले.

हेही वाचा

निरा-देवघर भागात भाताची धूळपेरणी

नाशिक : मनपामध्ये आयुक्त नसताना ‘आरोग्य’मध्ये बदल्या

पुणे-सोलापूर महामार्ग बनतोय कचरा डेपो

Back to top button