पुणे-सोलापूर महामार्ग बनतोय कचरा डेपो | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्ग बनतोय कचरा डेपो

अजय कांबळे

कुरकुंभ(पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. वाढत्या कचर्‍यामुळे महामार्गाला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबत संबंधित यंत्रणा नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प आहे. कचर्‍याची तातडीने दखल घेऊन कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत वाड्यावस्त्या, नागरी वसाहती, गृहप्रकल्प, बंगले, घरे, हॉटेल, धाबे, दुकाने वाढली आहेत. त्यामुळे कचराही वाढला आहे. कचरा हा कचराकुंडीत, कचरा संकलन करणार्‍या वाहनात टाकणे गरजेचे आहे. मात्र, घरगुती कचर्‍यासोबत विशेषतः हॉटेल व्यवसायिक ओला व सुका कचरा महामार्गालगत, फुटपाथवर फेकून देत आहेत.

या कचर्‍यात चहाचे रिकामे कप, खराब पालेभाज्या, प्लॅस्टिक बॉटल, कॅरिबॅग, खराब कपडे, रिकामी खोकी, कोंबड्यांची पिसे, कुजलेले मांस, माशांची घाण, गुटख्याच्या पुड्या यांचा समावेश आहे. त्याचबरोबर मृत जनावरेदेखील महामार्गालगत आणून टाकली जात असल्याने परिसरात कायमच दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

वारंवार टाकला जाणारा कचरा सर्वसामान्यांना दिसून येतो; मग टोल प्लाझाच्या संबंधित विभागाला दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कचर्‍यात जनावरांचा वावर वाढत असल्याने रस्त्यावर सैरभैर धावत सुटतात. त्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका संभवतो. महामार्गावरील व आजूबाजूची साफसफाई करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात.

तरीही महामार्गावर कचर्‍याचे भयानक चित्र दिसून येते. मग तो खर्च नेमका कुठे केला जातो? साफसफाईच्या नावाने कायमच बोंब असते. बर्‍याचदा महामार्गालगत साचलेला कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कचर्‍याला आग लावून जाळला जातो. वार्‍यामुळे ही आग आजूबाजूला पसरते, धुराचे लोटचे लोट उसळतात, जळते कागद उडतात, आगीच्या शेजारूनच पेट्रोल, डिझेल, गॅस यांसह केमिकल घेऊन जाणारे ट्रक, टँकरची जात असतात. अशा वेळी एखादी मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा

पैठणची शाळा घडवतेय टाळकरी अन् कीर्तनकार !

नाशिकरोड व्यापारी बँकेचे मतदान शांततेत; दोन जागेंसाठी तीन उमेदवार रिंगणात

पिंपरी : इंद्रायणीकाठी भक्तिरसात न्हाले वारकरी

Back to top button