

पुणे; पुढारी वृत्तसेवा : संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमन, मुक्काम व प्रस्थानानिमित्त पुणे पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शनिवारी (दि. 10) बंदोबस्त, वाहतूक आदी बाबींचा आढावा घेतला. सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या समन्यवयातून वारी सोहळ्याची तयारी करण्यात आल्याचे रितेश कुमार यांनी सांगितले. पालखी सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, उपायुक्त (वाहतूक) विजयकुमार मगर उपस्थित होते.
यंदाचा पोलिस बंदोबस्त दरवर्षीपेक्षा थोडा वेगळा असणार आहे. बंदोबस्तात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. ड्रोन सर्व्हेलन्स, लाईव्ह डायव्हर्जन, पालखीचे जीपीएस लोकेशन आणि शेकडो सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर हे बंदोबस्ताचे वैशिष्ट्य असणार आहे. पुणे शहरात प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी वारी पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी व अभ्यासासाठी राज्यभरातून तसेच परदेशातून नागरिक येत असतात. या सोहळ्यामुळे शहर आणि परिसरात चैतन्य निर्माण होते.
पालखीशी लाखो लोकांच्या भावना निगडित असल्याने कोणत्याही परिस्थितीत पालखीचे आगमन व मुक्कामाच्या ठिकाणी तसेच मार्गक्रमणाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठी काळजी घेतली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही कडक बंदोबस्त असता, तरी त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. दोन्ही पालख्यांसोबत पोलिसांच्या प्रत्येकी चार दुचाकी असणार आहेत. या चारही दुचाकींना जीपीएस बसवलेले असेल, यामुळे पालख्यांचे लोकेशन सातत्याने कळणार आहे.
त्यानुसार पालखीमार्गावरील वाहतूक सुरू आणि बंद ठेवण्यात येईल. यातील दोन दुचाकी पालख्यांसोबत तर दोन दुचाकी दोन किलोमीटर पुढे असणार आहेत. पालख्यांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येकी एक ड्रोन दोन्ही पालख्यांसोबत असणार आहे. तर गर्दीमुळे अनेकदा पालख्यांतील वारकर्यांचे मोबाईल जॅम होतात. त्यांना नेटवर्क मिळत नाही, यामुळे वैद्यकीय आपत्ती व एकमेकांची ताटातूट झाल्यावर अडचण निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही पालख्यांसोबत प्रत्येकी दहा-दहा वॉकी टॉकी देण्यात येणार आहेत. याचा वापर मोबाईल जॅम झालेल्या वारकर्यांच्या मदतीसाठी असेल.
मेट्रोचे काम सध्या थांबविण्यात आले असून, पालख्यांचे प्रस्थान होईपर्यंत ते सुरू करण्यात येणार नाही. तसेच मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणचे अडथळे काढून घेण्यात आले आहेत. बॅरिकेडसही आत घेण्यात आले आहेत. जिथे रस्ता अरुंद झाला आहे तिथे जादा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोरोनामुळे मागील दोन-तीन वर्षे अनेकांना वारीत सहभागी होता आले नाही, यामुळे यंदा किमान सात ते आठ लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तयारी केली असल्याची माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.
सोहळ्यात सात ते आठ लाख वारकरी सहभागी होण्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता यंदा अधिक आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकेदेखील तैनात करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या सर्व पथकांवर चोर्या रोखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सर्व सूचना त्यांना देण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.
हेही वाचा