पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजिलेल्या स्नेहमेळाव्यास विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. मात्र, या कार्यक्रमाकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पाठ फिरवल्याने ते नाराज असल्याची कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा रंगली होती.
वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर मध्यवर्ती पक्ष कार्यालयात ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार अॅड. जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, दीपक मानकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पक्ष कार्यालयासमोर सायंकाळी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास भाजप, काँग्रेस, मनसे, शिवसेनेसह इतर राजकीय पक्षांचे व सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या.
स्नेहमेळाव्यास विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार येणार असल्याचे शहर पदाधिकार्यांकडून जाहीर करण्यात आले होते. अजित पवार विमानतळावर आले आहे, तेथून निघाले आहेत, असेही पदाधिकारी वारंवार सांगत होते. त्यामुळे कार्यकर्ते अजित पवार यांच्या रस्त्याकडे डोळे लावून बसले होते. मात्र, अजित पवार स्नेहमेळाव्यास आलेच नाहीत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांनी निवड झाल्याने आणि आजित पवार यांच्यावर राष्ट्रीय पातळीवर कोणतीही जबाबदारी दिली नसल्याने ते नाराज झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू होती.
हेही वाचा