अंबरनाथ एमआयडीसीतील कंपनीत स्फोट; एकाचा मृत्यू | पुढारी

अंबरनाथ एमआयडीसीतील कंपनीत स्फोट; एकाचा मृत्यू

अंबरनाथ, पुढारी वृत्तसेवा : येथील वडोल एमआयडीसीतील ब्लु जेट हेल्थ केअर कंपनीत नायट्रिक अ‍ॅसिड आणि सल्फ्युरिक अ‍ॅसिडमधील झालेल्या रिअ‍ॅक्शनमुळे रिअ‍ॅक्टरमध्ये झालेल्या केमिकल स्फोटात कंपनीतील पाच कामगार जखमी झाले असून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास कंपनीतील प्लांट नंबर दोनमध्ये हा स्फोट झाला. यात सूर्यकांत जिमात या कामगाराचा मृत्यू झाला आहे.

ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत रिऍक्टरमध्ये झालेल्या स्फोटात रघुनाथ दास, पावन बीद, समीर पार्टे, गौतम जाधव हे पाच कामगार जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. कंपनीतील आग विझवण्यासाठी तब्बल चार तास लागल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने व त्यांच्या टीमने ही आग मोठ्या हिमतीने आटोक्यात आणली.

या कंपनीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली आहे. कंपनीतील रियाक्टरमध्ये झालेल्या स्फोटामुळे परिसरात व कल्याण- बदलापूर या राज्य महामार्गावर धुराचे लोत पसरल्याने नागरिकांना श्वसनाचे त्रास झाल्याच्या घटना घडल्या.

Back to top button