पुणे : सुट्ट्यांमध्ये पीएमपी सुसाट; मासिक उत्पन्नात 2 कोटी, तर प्रवाशांमध्ये 9 लाखांनी वाढ | पुढारी

पुणे : सुट्ट्यांमध्ये पीएमपी सुसाट; मासिक उत्पन्नात 2 कोटी, तर प्रवाशांमध्ये 9 लाखांनी वाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुटीच्या मे महिन्यात शाळा, महाविद्यालये बंद, चाकरमान्यांना सुट्या या सर्व कारणांमुळे पीएमपीचे उत्पन्न कमी होणार, हे ठरलेलंच. परंतु, यंदा पीएमपीला उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात अधिक उत्पन्न मिळाले आहे. मेमध्ये सर्वाधिक 9 लाख जादा प्रवाशांनी पीएमपी बसमधून प्रवास केल्याची नोंद पीएमपी प्रशासनाने केली आहे. त्या अधिकच्या प्रवाशांच्या वाहतुकीतून पीएमपीला सुमारे 2 कोटींचे अधिक उत्पन्न मिळाले आहे.

सुट्यांच्या काळात प्रवासी कमी होण्याऐवजी यंदा पीएमपीचे प्रवासी वाढल्याचे चित्र आहे. कारण यंदा सुट्यांच्या काळात पुणेकरांनी कुटुंबीयांसह घराबाहेर पडून पुणे व परिसरातील पर्यटनावर भर दिल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच, पीएमपीने केलेल्या मार्गांच्या सूसुत्रीकरण आणि नियोजनाचाही यंदा फरक पडल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

पुणे दर्शनचेही उत्पन्नही जोरात

पीएमपीच्या बसगाड्यांमार्फत पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला असून, त्याचा पीएमपीला मोठा फायदा झाला आहे. नियमित बससेवेप्रमाणेच पीएमपीच्या पर्यटन विशेष पुणे दर्शन सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, यामध्ये मे माहिन्यात 2 लाखांनी वाढ झाली आहे.

संचलन 3 लाख किलोमीटरने वाढले

पीएमपी प्रशासनाच्या मे महिन्यात उत्पन्न आणि प्रवासी यांच्या वाढीसोबतच बसगाड्यांच्या फेर्‍यांमध्ये आणि संचलनाच्या किलोमीटरमध्येसुध्दा चांगलीच वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये 5 लाख 63 हजार 726 तर मे महिन्यात 5 लाख 72 हजार 719 फेर्‍या पूर्ण केल्या. तसेच, एप्रिलमध्ये संचलन किलोमीटर 1 कोटी 3 लाख 71 हजार 631 होते. हा आकडा मे महिन्यात 1 कोटी 6 लाख 5 हजार 550 किलोमीटरपर्यंत पोहोचला.

एप्रिल महिना

प्रवासी संख्या : 3 कोटी 40 लाख 37,060 प्रवासी
उत्पन्न : 47 कोटी 34 लाख 29 हजार 697 रूपये

मे महिना

प्रवासी संख्या : 3 कोटी 48 लाख 82,978 प्रवासी
उत्पन्न : 49 कोटी 48 लाख 30 हजार 029 रुपये
एप्रिलमध्ये मिळालेले उत्पन्न : 3 लाख रुपये
मे महिन्यात मिळालेले उत्पन्न : 5 लाख रुपये

हेही वाचा

Donald Trump : अमेरिकेची आण्विक गुपितेही ट्रम्प यांच्या घरात

WTC Final 2023 : शिवधनुष्य पेलण्यासाठी निग्रहाने टिकण्याची गरज

Indian Navy : ‘विक्रांत’सह ‘विक्रमादित्य’ पहिल्यांदाच समुद्रात; नौदलाचा सर्वात मोठा सराव

Back to top button