Ashadhi Wari 2023 : ‘श्रीमंत दगडूशेठ’चरणी माउलींचे अश्व नतमस्तक | पुढारी

Ashadhi Wari 2023 : ‘श्रीमंत दगडूशेठ’चरणी माउलींचे अश्व नतमस्तक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत गणराया चरणी नतमस्तक झाले. गणपती बाप्पा मोरया… माउली माउलीच्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत निर्मल वारी – हरित वारी करिता श्री गणेश आणि माउलीचरणी प्रार्थना केली. तसेच, मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

कर्नाटक बेळगाव मधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या हिरा-मोती या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, अमोल केदारी यांच्यासह श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे (सरकार), महादजी राजे शितोळे (सरकार), मारुती कोकाटे आदी उपस्थित होते.

महादजी राजे शितोळे सरकार म्हणाले, गणपती बाप्पाच्या दर्शनाने ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेने वारीमध्ये पुढे चालत जात असतो. बाप्पाचे असेच आशिर्वाद कायम वारक-यांवर असावे. दरवर्षी सुमारे 300 किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिराबाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. मात्र, आता अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे. आता श्रीगणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आळंदीकडे प्रस्थान करतील. ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात.

हेही वाचा

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; महापालिकेचे दवाखाने तीन दिवस मोफत

दिव्यांगाचा कार्यालयात सत्याग्रह; हवेली तहसील प्रशासनाची धावपळ

Back to top button