पुणे : खेळण्यांच्या संगतीने लागते शिक्षणाची गोडी! | पुढारी

पुणे : खेळण्यांच्या संगतीने लागते शिक्षणाची गोडी!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खेळणी म्हणजे लहान मुलांना आनंदाची पर्वणीच. त्याच खेळण्यांमधून मुलांना शिक्षण मिळाले तर तो पालकांसाठी दुग्धशर्करा योगच. त्यापार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये खेळण्यांच्या स्वरुपात अक्षर, शब्द, अंक, फुले, प्राणी यांची ओळख करून देणारे विविध प्रकारचे नवनवीन शैक्षणिक साहित्य बाजारात दाखल झाले आहे. मोबाईलमधील अ‍ॅप्सद्वारे शैक्षणिक गोष्टी उपलब्ध होत असतानाही आपल्या चिमुकल्यांसाठी शैक्षणिक खेळण्यांची खरेदी करण्याकडे पालकांचा कल असल्याचे बाजारात होत असलेल्या मागणीवरून दिसून येते.

खेळातूनच अभ्यासासाठी उपयुक्त गोष्टी शिकता याव्यात, या संकल्पनेतून बाजारात विविध वयोगटांतील शालेय मुलांसाठी ही खेळणी उपलब्ध झाली आहेत. विविध वयोगटांतील शालेय मुलांसाठी बाजारात उपलब्ध झालेल्या या खेळण्यांमध्ये नर्सरीपासून सिनियर केजीपर्यंतच्या चिमुकल्यांसाठी सर्वाधिक पर्याय उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांमध्ये गणित, भूगोल, विज्ञान यांसारख्या विषयांची गोडी निर्माण व्हावी, यासाठी लाइफ सायकल, इंडिया अँड द वर्ल्ड यांसारखे पझल गेम तर मुलांमधील वैज्ञानिक घडविण्यासाठी द यंग सायंटिस्ट सारख्या अ‍ॅक्टिव्हिटी खेळांची बाजारात चलती आहे.

याखेरीज, फ्लॅश कार्ड टाकल्यास संबंधित कार्डवरील असलेल्या चित्राची ओळख सांगणार्‍या खेळण्याला विशेष पसंती मिळत आहे. फोम मॅट चे नकाशे, अंकगणित तसेच इंग्रजी वर्णाक्षरे खरेदी करण्याकडे नागरीकांचा कल आहे. बाजारात लाकडी, फोम तसेच प्लास्टिकच्या स्वरुपात ही खेळणी दिसून येत आहेत.

रोबोट, एफएम रेडिओ स्पोर्टस कार अशा विविध वस्तूंचे सुटे भाग आणि त्यासोबत एक मार्गदर्शिका दिलेले असतात. त्यानुसार सुट्या भागांची जोडणी करून मुले स्वत: नवीन उपकरण बनवू शकतात. यातून त्यांच्या बुध्दिमत्तेला चालना तर मिळतेच तसेच त्यांना या विषयाबद्दलची गोडी निर्माण होण्यास मदतही मिळते. बाजारात उपलब्ध असणार्‍या या शैक्षणिक खेळण्यांची किंमत 300 रुपयांपासून सुरू होत असल्याचे माहिती विक्रेते दिनेश शहा यांनी दिली.

हेही वाचा

पुणे : लाचखोर झाले उदंड; शिक्षेचे धनी मोजकेच!

पुणे : दरोडा टाकून चोरी करणाऱ्या पाच दरोडेखोरांना बेड्या

पुणे : पालिका जोडणार कमी लांबीच्या मिसिंग लिंक

Back to top button