पुणे : पालिका जोडणार कमी लांबीच्या मिसिंग लिंक | पुढारी

पुणे : पालिका जोडणार कमी लांबीच्या मिसिंग लिंक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भूसंपादनामुळे रखडलेल्या लहान लांबीच्या (0 ते 100 मीटर ) मिसींग लिंक जोडण्याचे काम पालिकेकडून हाती घेतले जाणार आहे. या मिसिंग लिंक जोडल्यानंतर अनेक रस्ते नागरिकांना नव्याने उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. शहराचा आकार, लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन महापालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यशहरासह उपनगरांमध्ये उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि लहान मोठ्या लांबीचे आणि रुंदीचे रस्ते विकसित केले जातात.

मात्र, दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतुक कोंडीत भर पडत आहे. विकास आराखड्यात (डिपी) दाखवलेल्या रस्त्याची संपूर्ण जागा ताब्यात आली तरच त्या रस्त्याचा पूर्ण वापर करता येतो. अन्यथा लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्ता वापराविना पडून राहतो. पुण्यातही डीपीमध्ये समावेश असलेले अनेक रस्ते भूसंपादन आणि इतर कारणांमुळे रखडलेले आहेत. महापालिका हद्दीत 520 कि. मी. लांबीचे रस्ते तुकड्या तुकड्यामध्ये 700 ठिकाणी रखडले आहेत.

रखडलेले रस्त्यांमध्ये 0 ते 100 मी, 100 ते 500 मी, 500 ते 1000 मी. आणि एक कि.मी. लांबीच्या पुढे अशा रस्त्यांचा समावेश आहे. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेने या मिसिंग लिंक जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 0 ते 100 मीटर अंतराचे 80 ठिकाणचे रस्ते जोडले जाणार आहेत. त्यानंतर जास्त लांबीचे रखडलेले रस्ते जोडले जाणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे.

हेही वाचा

Brijbhushan Singh : बृजभूषण यांनी कुस्तीपटूंशी गैरवर्तन केले होते; कुस्ती पंच जगबीर

पुणे : शेतकर्‍यांच्या विकासात भू-विकास बँकेचे मोलाचे योगदान : अजित पवार

पुणे : लाचखोर झाले उदंड; शिक्षेचे धनी मोजकेच!

Back to top button