सोलापूर : आषाढी वारी सुरू होण्यापूर्वी रस्ते सुस्थितीत करावेत - मंत्री रवींद्र चव्हाण | पुढारी

सोलापूर : आषाढी वारी सुरू होण्यापूर्वी रस्ते सुस्थितीत करावेत - मंत्री रवींद्र चव्हाण

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २९ जून रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत मोठ्या संख्येने वारकरी भाविक येतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी वारीपूर्वी वारी मार्गांवरून पालखी तळावर जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी. आवश्यक ठिकाणी मुरुमीकरण करून घ्यावे. खड्डे भरून घ्यावेत. साईड पट्ट्याची कामे करून घ्यावीत, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.९) दिल्या.

मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखीतळ व मार्गावरील रस्त्यांच्या सुस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना केल्या. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते, वेळापूर येथील पालखीतळ तसेच पुरंदावडे येथील रिंगण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार राहुल कुल, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता संजय माळी, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, कार्यकारी अभियंता अमित निमकर, सुनिता पाटील, नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालखी मार्गावरुन पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची वारीपूर्वी दुरूस्ती करावी. आवश्यक ठिकाणच्या रस्त्यावर पथदिव्यांची व्यवस्था करावी. तसेच पालखी तळावर मुरूमीकरण, स्वच्छता, मुबलक पाणी पुरवठा, त्याचबरोबर आवश्यक ठिकाणच्या पालखी विसावा व तळाच्या कट्ट्यांची दुरुस्ती करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, पालखी मार्गावर व तळांवर उपलब्ध सोयी सुविधांचे सूचना फलक लावावेत. नवीन महामार्गांच्या कामांमुळे काही ठिकाणी पालखी मार्गात बदलाची शक्यता गृहित धरून दर्शनी भागात सूचना फलक लावावेत, अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी केल्या.

हेही वाचलंत का?

Back to top button