बारामती : पालखी सोहळ्यापूर्वी विनानोंदणी दिंड्यांची होणार नोंदणी : महसूलमंत्री विखे पाटील

बारामती : पालखी सोहळ्यापूर्वी विनानोंदणी दिंड्यांची होणार नोंदणी : महसूलमंत्री विखे पाटील

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पालखी सोहळ्यात नोंदणी नसणा-या दिंड्या सहभागी होतात. नोंदणीकृत दिंड्यांपूर्वीच त्या मुक्कामी जातात. त्यामुळे नियोजन करणे अडचणीचे होते. त्यासाठी यंदा पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापूर्वीच सोहळा संस्थान विश्वस्त व विभागीय आयुक्तांच्या सहीने सर्व दिंड्या नोंदणीकृत केल्या जातील, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा 18 जूनला बारामती शहरात मुक्कामी आहे.

त्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी गुरुवारी (दि. 8) येथील शारदा प्रांगणातील मुक्काम स्थळाची पाहणी करत अधिकार्‍यांना सूचना दिल्या. या वेळी माणचे आमदार जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रांताधिकारी वैभव नावडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कार्य अधिकारी हनुमंत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यंदाच्या सोहळ्यात भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जुलैमध्ये सोहळा पंढरीकडे जातो. यंदा तो लवकर आला आहे. उन्हाची तीव—ता प्रचंड आहे. त्यादृष्टीने विसाव्यासह मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, निवारा अशी पुरेशी व्यवस्था करणार आहे. पारंपरिक व्यवस्थेमध्ये शासन कुठेही हस्तक्षेप करणार नाही. प्रवासात वारक-यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे याची खबरदारी घेतली जाईल. आरोग्यविषयक सोयी, पुरेशा रुग्णवाहिका, मोबाईल वॉरिअर्स, आरोग्य सेवक तैनात केले जातील, असे मंत्री विखे पाटील म्हणाले.

सोहळ्यासाठी रस्त्यांची कामे सुरू आहेत. आवश्यक तेथे रुंदीकरण करून साईडपट्ट्या भरत आहेत. पुढील आठ दिवसांत ही कामे होतील. विभागीय आयुक्त त्याचे नियंत्रण करत आहेत. भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह, स्वच्छतागृह व बाकीच्या सुविधा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सीसीटीव्ही यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यान्वित करणार आहे, जेणेकरून स्थानिक पोलिसांना मदत होईल. विनानोंदणी दिंड्याबाबत सोहळा विश्वस्तांसोबत चर्चा झाली आहे. त्यांची नोंदणी केली जाईल. विश्वस्त व विभागीय आयुक्तांच्या सहीचे पत्र त्यांना दिले जाईल. मुख्य दिंड्या पुढे गेल्यानंतरच बाकीच्या दिंड्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

सेंट्रल कमांड सिस्टीमचा वापर

पालखी सोहळ्यात यंदा सेंट्रल कमांड सिस्टीमचा वापर होणार आहे. त्या अंतर्गत एका अ‍ॅपवर पालखी थांबा, विसावा, मुक्कामाची ठिकाणे, तेथील अधिकार्‍यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे कोणत्याही क्षणी मदतीची गरज भासली, तरी अ‍ॅपद्वारे तत्काळ संबंधिताची माहिती मिळेल. गोंधळाची स्थिती राहणार नाही. पुणे, सातारा व सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त त्यावर नियंत्रण ठेवतील.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news