खोर परिसरात अंजीर पूर्व मशागतीच्या कामांना वेग | पुढारी

खोर परिसरात अंजीर पूर्व मशागतीच्या कामांना वेग

खोर(ता.दौंड); पुढारी वृत्तसेवा : खोर परिसरातील अंजिराचा हंगाम संपला आहे. वर्षातील जवळपास चार- चार महिने खट्टा व मिठा बहारचा हंगाम या भागात घेतला जातो. जवळपास 25 ते 30 एकरांवर अंजिराचे उत्पादन घेणारे खोर हे दौंड तालुक्यातील एकमेव गाव आहे. जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात खोरच्या अंजिराचे नाव बाजारपेठेत टिकून आहे.

खोर परिसरात सध्या अंजिरांच्या पूर्व हंगामी मशागतीच्या कामाला वेग आला आहे. खोर येथे खट्टा बहार व्यवस्थापनाला सुरुवात झाली आहे. बागेत छाटणी, चाळणी, बांधणी, झाडांना पाणी देणे ही कामे सुरू आहेत. शेणखत, कोंबडीखत, गांडूळखत आदींचा अधिकाधिक वापर होत आहे. पॉवर विडरने चाळणी करून पाणी दिले जात आहे. काही शेतकरी माती परीक्षण करून खत मात्रा देत आहेत.

मान्सूनपूर्व एकही पाऊस न झाल्याने अंजीर उत्पादकांमध्ये चिंता आहे. थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध असणार्‍या शेतकर्‍यांनी छाटणीची कामे सुरू केली आहेत. चांगला पाऊस झाल्यास या बागा साधारण ऑक्टोबर महिन्यात फळ तोडणीला येतील, असे अंजीर उत्पादक समीर डोंबे म्हणाले. चांगल्या प्रतीमुळे खोरच्या अंजिराला चांगली मागणी आहे. चांगला पाऊस झाला तर आगाप मालाचे चांगले पैसे होण्याची अपेक्षा आहे. खोरला 25 ते 30 कोटी रुपये उत्पन्न फक्त अंजिरातून मिळते. परिणामी, जनाई शिरसाई प्रकल्प योजनेतून फडतरे वस्ती तलावात, तर पुरंदर उपसा जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी तलावात पाणी सोडण्याची शेतकरी मागणी करत आहेत. पाणी बचतीसाठी काही शेतकरी बागेत उसाच्या पाचटाचे आच्छादन करत असल्याचेही समीर डोंबे यांनी सांगितले.

खोरच्या परिसरात अंजीर बागा टिकविण्यास पाण्याची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले. मात्र, ह्या आवर्तनामधून पैसे भरूनही गरजेइतके पाणी मिळाले नाही. पुन्हा एक आवर्तन दोन्ही सिंचन योजनेतून सोडून अंजीर बागांना उन्हाळ्याच्या कालावधीत दिलासा देण्याची गरज आहे.

                                                         – जालिंदर डोंबे, अंजीर उत्पादक, खोर.

हेही वाचा

भाजपची सर्व लोकसभा, विधानसभा मतदारसंघाची तयारी

जळगाव : वाढते तापमान अन् भारनियमनामुळे केळी उत्पादक अडचणीत

वाडा : जुना वाडा गावच्या आठवणीत अनेकांचे डोळे पाणावले

Back to top button