भाजपची सर्व लोकसभा, विधानसभा मतदारसंघाची तयारी | पुढारी

भाजपची सर्व लोकसभा, विधानसभा मतदारसंघाची तयारी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  पुढील वर्षात होऊ घातलेली लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत लढविणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते देत असताना भाजपने मात्र दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख नियुक्त करून भाजपने वेळप्रसंगी सर्व मतदारसंघ लढण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. सांगलीसाठी दीपक शिंदे तर हातकणंगलेसाठी सत्यजित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख घोषित केले. त्याचवेळी त्यांनी आम्ही आगामी सर्व निवडणुका युतीच्या माध्यमातूनच लढविणार असल्याने आमचे निवडणूक प्रमुख शिवसेनेसाठीही काम करणार असल्याचे स्पष्ट केले. पक्षाने नियुक्त केलेले निवडणूक प्रमुख भाजप बरोबरच शिवसेनेच्या उमेदवारांनाही सहकार्य करणार आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले. भाजप – शिवसेना युतीने लोकसभेच्या 45 आणि विधानसभेच्या 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केल्याचेही ते म्हणाले.

फडणवीस यांचे दुसरे स्वीय सहाय्यकही राजकारणात सक्रिय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक स्वीय सहायक अभिमन्यू पवार हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लातूरच्या औसा मतदासंघातून निवडून गेले. तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांच्यामुळे पवार यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. आता त्यांचे दुसरे स्वीय सहायक सुमित वानखेडे हे देखील राजकारणात सक्रिय होत आहेत. त्यांना वर्धा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख करण्यात आले आहे. वानखेडे हे फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. ते आतापर्यंत वर्धा जिल्ह्याच्या राजकारणात पडद्यामागून सक्रिय होते. लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घेऊन ते भाजपमध्ये अधिकृतपणे सक्रिय झाले आहेत.

10 तारखेला अमित शहा नांदेडमध्ये

दरम्यान, मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपतर्फे सध्या सुरु असलेल्या महा जनसंपर्क अभियानात नांदेड येथे 10 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही राज्यात सभा होणार आहे. या अभियानात मोदी सरकारची कामगिरी सामान्य माणसापर्यंत पोहचविली जाणार आहे. या अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी, यासाठी प्रयत्न चालू आहेत. या अभियानात घरोघरी जाऊन मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरित केली जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून 3 कोटी कुटुंबांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

लोकसभा मतदारसंघ आणि निवडणूक प्रमुख (कंसात)

मावळ (आमदार प्रशांत ठाकूर) रायगड (सतीश धारप), रत्नागिरी – सिंधुदुर्ग (प्रमोद जठार), कोल्हापूर (धनंजय महाडिक), हातकणंगले (सत्यजित देशमुख), सांगली (दीपक शिंदे) सातारा (अतुल भोसले), पुणे (मुरलीधर मोहोळ), बारामती (राहुल कूल), शिरूर (महेश लांडगे), सोलापूर (विक्रम देशमुख), माढा ( प्रशांत परिचारक), धाराशिव (नितीन काळे) बीड (राजेंद्र म्हस्के),लातूर (दिलीप देशमुख),परभणी (प्रसाद बोर्डीकर) जालना (विजय औताडे),हिंगोली (रामराव वडकुते), नांदेड (व्यंकट गोजेगावकर), संभाजीनगर (समीर राजूरकर), अहमदनगर (बाबासाहेब वाकडे), शिर्डी (राजेंद्र गोंदकर) नागपूर (प्रवीण दटके), अमरावती ( संजय डेहनकर), रामटेक (अरविंद गजभिये), वर्धा (सुमित वानखेडे) अकोला (अनुप धोत्रे), बुलढाणा (विजयराज शिंदे), यवतमाळ वाशिम, भंडारा गोंदिया (विजय शिवणकर) चंद्रपूर (प्रमोद कडू), गडचिरोली (किसन नागदेवे)

Back to top button