पुरंदरला तीन टँकरने पाणीपुरवठा; तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढली | पुढारी

पुरंदरला तीन टँकरने पाणीपुरवठा; तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढली

परिंचे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढत असून, ग्रामीण भागामध्ये पाणीसाठा कमी होत असल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर टँकरची मागणी करणार्‍या गावांची संख्याही वाढू लागली आहे. सध्या सोनोरी, रिसे आणि वाल्हे या तीन ग्रामपंचायतींना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

आतापर्यंत 3 गावठाण आणि 17 वाड्या-वस्त्यांवरील 3 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यात आणखी टँकरची वाढ होण्याची शक्यता आहे. तीन टँकरला उपविभागीय अधिकारी मिनार मुल्ला यांनी परवानगी दिली असून, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांनी या संदर्भात आदेश पारित केले आहेत

सोनोरी, मळईचा मळा, पिंपळवस्ती, किल्ला पायथा, अंबरूषी, माळवदकरवस्ती, आढाळगेवस्ती, शिंदेवस्ती, कामठेवस्ती, पाटीलवस्ती, रिसे, कामठेवस्ती, पाटीलवस्ती, खोपडेवाडी, हांडेवरती, कांबळेवस्ती, वाल्हे, गायकवाडवस्ती, आंबाजीचीवाडी, मुकादमवाडी या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

पालखी सोहळ्याला पाण्याची टंचाई होण्याची शक्यता

सासवड नगरपालिकेकडे असणार्‍या घोरवडी व गराडे हे दोन्ही बंधारे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या तोंडावर पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याने प्रशासनाची धावपळ उडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पिलानवाडी धरणामध्येदेखील पाण्याची पातळी खाली गेली असून, तेथे टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध राहील की नाही, याचीदेखील शक्यता कमी आहे. पिलानवाडी धरणामधून शेतीसाठी पाण्याचा उपसा केला जात आहे, त्यामुळे पालखी सोहळा काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावणार आहे.

हेही वाचा

नाशिक : गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या पूजा भोईरच्या पोलिस कोठडीत वाढ

नगर जिल्ह्यात चार दिवस वादळी पावसाची शक्यता

Back to top button