

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 8 ते 12 जून या कालावधीत विजांच्या कडकडाट आणि वादळी वार्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून, गुरुवारपासून मृग नक्षत्र सुरू झाले आहे. आगामी चार दिवसांत वादळी वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी आवाहन केले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वादळ सुरू असताना व विजा चमकत असताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणार्या, लोंबकळणार्या तारा, केबलपासून दूर राहावे. वादळी वार्यामुळे घर, पत्र्याचे शेड व शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्यांनी वेळीच नियोजन करावे. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. वादळी वारे, वीज, गारपीट आणि पाऊस यापासून जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
..तर या ठिकाणी संपर्क साधा
आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 1077 (टोल फ्री), 0241-2323844 अथवा 2356940 या क्रमांकावर संपर्क साधावा.
विजा चमकत असताना ही काळजी घ्या
मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळून दहा जण दगावले. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावेत, तसेच डोके दोन्ही गुडघ्यांत झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हे ही वाचा :