

वडगाव शेरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हरिनगर परिसरात ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे ओढ्यातून मैलापाण्याचा पूर आला आहे. यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, पावसाळा जवळ आलेला असला, तरी ओढ्याची साफसफाई महापालिकेने केली नाही. त्यामुळे पावसाळ्यात हरिनगरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
लोहगावातून येणारा ओढा विमाननगर, रामवाडी, हरिनगर मार्ग कल्याणीनगर येथे नदीला मिळतो. या ओढ्यातून महापालिकेने ड्रेनेज लाईन टाकली आहे. हरिनगरला नाल्यामधील दोन ड्रेनेज फुटले आहेत. तसेच नाल्यामध्ये मैलापाणी सोडले आहे. यामुळे नाल्यामध्ये सध्या सांडपाण्याचा पूर वाहताना दिसत आहे. हरिनगर सोसायटीतील मैदानामध्ये पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहेत.
यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, या भागात साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ड्रेनेज विभागाचे अधिकारी हेमंत देसाई यांनी सांगितले की, हरिनगरमधील ओढ्याची लवकरच पाहणी केली करून ड्रेनेज लाईनची साफसफाई केली जाईल.
ड्रेनेज लाईन फुटल्याने ओढ्यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत आहे. महापालिका प्रशासनाने या ओढ्याची पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी साफसफाई अद्यापही केली नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात हरिनगरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
– सुधीर गलांडे, रहिवासी,
हरिनगर, वडगाव शेरी
हेही वाचा