पुणे : पालखी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल मंदिरांमध्ये तयारी अंतिम टप्प्यात | पुढारी

पुणे : पालखी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल मंदिरांमध्ये तयारी अंतिम टप्प्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विद्युत रोषणाईने उजळलेला मंदिर परिसर, उत्सव मंडपाची उभारणी, वारकर्‍यांच्या मुक्कामासाठी असलेल्या सभागृहाची झालेली साफसफाई, मंदिरात केलेली देखणी सजावट आणि रंगरंगोटीने मंदिराला प्राप्त झालेले वेगळे रूप… अशी जय्यत तयारी श्री विठ्ठल मंदिरांमध्ये करण्यात आली आहे. संत

श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त श्री पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ) आणि श्री निवडुंग्या विठोबा मंदिर (नाना पेठ) येथील तयारी अंतिम टप्प्यात असून, चैतन्यमय वातावरण मंदिरांमध्ये आहे. यंदा दोन्ही मंदिरांतील व्यवस्थापनाकडून पालखी सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली असून, उत्सव मंडपाच्या उभारणीसह विद्युत रोषणाई, सजावटीचे कामही पूर्ण झाले आहे. श्री पालखी विठ्ठल मंदिरात 12 आणि 13 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचाही मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात असणार आहे.

श्री निवडुंग्या विठोबा मंदिराचे (नाना पेठ) व्यवस्थापक आनंद पाध्ये म्हणाले, ‘यंदा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत मोठ्या उत्साहाने करणार आहोत. तयारीही पूर्ण झाली आहे. यंदा सुमारे तीन ते साडेतीन हजार वारकरी मुक्कामासाठी येतील, असे वाटते, त्यानुसार निवासाची, जेवणाची व्यवस्था केली आहे. तर पालखीचे स्वागत 12 जूनला सायंकाळी पादुका पूजनाने होईल, तर दुसर्‍या दिवशी विश्वस्त मंडळाकडून पाद्यपूजन होईल.’

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पालखी सोहळ्यासाठी मंदिरात तयारी अंतिम टप्प्यात आहे. रंगरंगोटी सुरू आहे, उत्सव मंडप उभारले आहेत. वारकर्‍यांच्या मुक्कामासाठीही व्यवस्था केली आहे. मंदिरात पालखीच्या मुक्कामाच्या दिवशी रात्रभर जागरण असणार आहे, तर वारकर्‍यांकडून भजन-कीर्तन सादर होईल.

– प्रमोद बेंगरुट,
विश्वस्त, श्री पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ)

हेही वाचा

Earthquake : आसाममधील तेजपूरला भूकंपाचा धक्का; कोणतीही जीवितहानी नाही

नाशिक : पंचवटी मनपा प्रभारी विभागीय अधिकारीपदी योगेश रकटे

नाशिक : कर्ज दिलं दीड लाख वसुल केले 5 लाख, सावकाराविरोधात गुन्हा

Back to top button