पुणे महापालिकेच्या शिक्षकांना मिळणार पदोन्नती | पुढारी

पुणे महापालिकेच्या शिक्षकांना मिळणार पदोन्नती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकच्या शिक्षण विभागातील शिक्षकांना बढती मिळणार आहे. यामध्ये 142 शिक्षकांना मुख्याध्यापकपदी, तर पर्यवेक्षकपदी 25 जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. तब्बल पाच वर्षांनंतर म्हणजे 2018 नंतर शिक्षकांची पदोन्नती झाली आहे.
महापालिकेच्या प्राथमिक विभागाच्या 285 शाळांपैकी 138 शाळांना मुख्याध्यापक नव्हते. त्यामुळे शिक्षकांकडेच प्रभारी मुख्याध्यापकपदाचा कार्यभार देण्यात येत होता, त्यामुळे या शिक्षकांच्या अध्यापनावर परिणाम होत होता.

त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मुख्याध्यापकांची नियुक्ती करणे गरजेचे होते. त्यातच महापालिकेत 34 गावे समाविष्ट झाल्याने गावातील शिक्षक पुणे महापालिकेत आले. त्यामुळे पुणे महापालिका आणि गावांतून आलेल्या शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेचा प्रश्न निर्माण झाला. त्या विरोधात काही शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या होत्या. त्यामुळे गेली पाच वर्षे सेवाज्येष्ठता यादी तयारच झाली नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयाने ज्या दिवसापासून शिक्षकांचा नोकरी सुरू केली तो दिवस सेवाज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरावा, असा निकाल दिला.

समाविष्ट गावांतील शिक्षकांचाही समावेश

पुणे महापालिकेच्या प्रशासन विभागाने शिक्षण विभागाच्या मदतीने शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार केली. ही यादी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार तयार करण्यात आली. त्यामुळे समाविष्ट गावांतून आलेल्या शिक्षकांचाही या यादीत समावेश झाला. या यादीला आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली.

महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांना मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकपदी पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षानंतर ही पदोन्नती झाली आहे.

– विक्रम कुमार,
आयुक्त, पुणे म. न. पा.

हेही वाचा

नगर : आगामी गाळप हंगाम वेळेत सुरू करणार : आमदार शंकरराव गडाख

नाशिक : महिलेवर अतिप्रसंग प्रकरणी टॅक्सीचालकाला अटक

Back to top button