नगर : आगामी गाळप हंगाम वेळेत सुरू करणार : आमदार शंकरराव गडाख | पुढारी

नगर : आगामी गाळप हंगाम वेळेत सुरू करणार : आमदार शंकरराव गडाख

सोनई (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : सध्या कारखान्याचा बंद हंगाम असल्याने मशिनरीची सर्व ओव्हर ऑईलिंग व रिपेरिंगची कामे प्रगतिपथावर आहेत. ती वेळीच पूर्ण करून गाळप हंगाम शासनाच्या धोरणानुसार वेळेत सुरू करण्याच्या दृष्टीने संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले. मुळा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 या 46 व्या गळीत हंगामाच्या पूर्वतयारीची कामे प्रगतिपथावर आहेत. नुकतेच आमदार गडाख यांच्या हस्ते मिल रोलर पूजन कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी मिल रोलरची विधिवत पूजा कारखान्याचे संचालक बाळासाहेब बनकर व नारायण लोखंडे यांचे हस्ते करण्यात आली.

या प्रसंगी आमदार गडाख म्हणाले, कारखान्याने मागील 2022-23 हंगामात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत सुमारे 9 लाख 77 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. 2023-24 हंगामासाठी तुलनेने कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे, कार्यक्षेत्राबाहेरून ऊस खरेदी करून ठरविलेले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कारखान्याच्या गाळप क्षमतेप्रमाणे प्रतिदिन ऊसाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने आवश्यक ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा निश्चित करून त्यांच्याशी करार करण्याची तयारी सुरू आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ज्या शेतकर्‍यांनी उसाच्या नोंदी अद्याप कारखान्याकडे दिलेल्या नाहीत, त्यांनी नोंदी देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर व सर्व संचालक, तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन संतोष फिरोदिया, सोपानराव बानकर, प्रा.शिवाजी दरंदले, विनायक पुंड, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले यांनी सर्वांचे आभार मानत येणार्‍या हंगामात कमी ऊस उपलब्ध असल्याने ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार, मजूर, अधिकारी व कर्मचार्‍यांनी हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा : 

https://pudhari.news/maharashtra/kokan/565127/cyclone-biperjoy-konkan-coast/ar

https://pudhari.news/maharashtra/nashik/565129/nashik-crime-abduction-of-three-girls-from-cidco-case-filed-in-ambad-police-station/ar

https://pudhari.news/maharashtra/pune/565142/work-of-new-airport-terminal-in-pune/ar

Back to top button