भाजपचं मिशन २०२४ : पुण्याची प्रमुखपदाची जबाबदारी ‘या’ तगड्या नेत्यावर | पुढारी

भाजपचं मिशन २०२४ : पुण्याची प्रमुखपदाची जबाबदारी 'या' तगड्या नेत्यावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यानुसार पुणे लोकसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी माजी महापौर व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्याकडे, तर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शिरूरला आमदार महेश लांडगे आणि मावळला आमदार प्रशांत ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणुकीतून अनेक मतदारसंघांत इच्छुकांना अप्रत्यक्षरीत्या उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिला असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नेमले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेच्या एकवीस मतदारसंघांचा समावेश आहे. या नेमणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक मतदारसंघात प्रमुख इच्छुकांवर निवडणूक प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या माध्यमातून एकप्रकारे या इच्छुकांना ‘कामाला लागा’ असाच संदेश देण्यात आला आहे.

पुणे लोकसभेसाठी मोहोळ हे इच्छुक आहेत. प्रदेश सरचिटणीसपदा पाठोपाठ त्यांना आता निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्याने उमेदवारीसाठी त्यांचे नाव आणखी आघाडीवर आले आहे. तर बारामती मतदारसंघात राहुल कुल आणि शिरूरमध्ये महेश लांडगे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. भाजपने त्यांच्याकडेच निवडणूक प्रमुखाची जबाबदारी सोपविली आहे. मावळमध्ये मात्र पनवेलचे आमदार ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूक प्रमुखपदाच्या निवडी करतानाही हेच सूत्र ठेवण्यात आले आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात पक्षाचे आमदार नाहीत अशा ठिकाणी तेथील इच्छुक उमेदवाराला निवडणूक प्रमुख बनविण्यात आले आहे. त्यात कसबा पेठेमध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, वडगाव शेरीमध्ये शहराध्यक्ष जगदीश मुळीक, हडपसर मतदारसंघात माजी आमदार योगेश टिळेकर, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, शिरूरमध्ये प्रदीप कंद यांची नेमणूक करण्यात आली आहे.

महापालिका निवडणूक प्रमुखपदी राजेश पांडे

पुणे महापालिका निवडणूक प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पक्ष संघटन मजबूत करून पुणे महापालिकेत पुन्हा यश मिळवू, असे पांडे यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

‘जबाबदारी सक्षमपणे निभावणार’

शिरुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदी आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार लांडगे म्हणाले की, शिरुर लोकसभा मतदार संघातील भोसरी, खेड, जुन्नर, आंबेगाव, मंचर आणि हडपसर या सहाही विधानसभा मतदार संघांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मतदार संघातील पुणे-नाशिक महामार्ग, तीर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकास, रेल्वे महामार्ग यांच्यासह विविध प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. ग्रामीण आणि शहरी असा मतदार निश्चितपणे विकासाच्या मुद्यांवर भाजपासोबत आहे. त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे निभावणार आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे.

बारामतीचे आव्हान

भारतीय जनता पार्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी आमदार राहुल कुल यांचे गुरुवारी (दि. 8) निवड केली, तर विधानसभा प्रमुख म्हणून आ. राहुल कुल यांचे विश्वासू सहकारी हरिभाऊ ठोंबरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने बारामती लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवार निवडून आणायचा चंग बांधला आहे.
आता जरी भाजपने एवढी मोठी जबाबदारी आ. राहुल कुल यांच्यावर टाकली असली, तरी राहुल कुल हे आव्हान कसे पेलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी अत्यंत अल्प कालावधीमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात जखडून ठेवले होते. कांचन कुल यांचा त्या वेळी पराभव झाला असला, तरी त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत जोरदार फाईट दिली होती.

पक्षाने आतापर्यंत दिलेल्या सर्व जबाबदार्‍या यशस्वीरीत्या पार पडल्या आहे. पुणे लोकसभेत पक्षसंघटन मजबूत करून पक्षाला पुन्हा यश मिळवून देऊ.

– मुरलीधर मोहोळ, निवडणूक

हेही वाचा

बँकांनो, ग्राहकाभिमुख व्हा!

नाशिक : लाचखोर सुनीता धनगर अखेर निलंबित

पुणे : नॅक मूल्यांकन नसेल तर प्रवेश थांबवा ! कुलगुरू डॉ. गोसावी यांचे आदेश

Back to top button