केडगाव ग्रा.पं. मध्ये सावळागोंधळ, सरपंचांची मनमानी

केडगाव ग्रा.पं. मध्ये सावळागोंधळ, सरपंचांची मनमानी
Published on
Updated on

केडगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्यास काही महिन्यांचा कालावधी असलेल्या केडगाव ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ निर्माण झाला असल्याने नागरिकांमध्ये ग्रामपंचायतीबाबत मोठा रोष व्यक्त होऊ लागला आहे. सरपंचांच्या मनमानीला आणि जाचाला कंटाळून येथे ग्रामसेवक टिकायला तयार नाही. साडेचार वर्षांत आठ ग्रामसेवक बदलले गेले आहेत. आठपैकी अडीच वर्षांत दोघे, तर उरलेल्या सहा महिन्यांत सहा जणांना जावे लागले आहे.

पुणे जिल्ह्यात ग्रामसेवकांची अशी सेवा देणारी ही एकमेव ग्रामपंचायत असावी. या पंचायत अंतर्गत विकासकामांमध्येही अनेक प्रकरणे गाजलेली आहे. सध्या सामाजिक कामांच्या 21 लाखांच्या निविदांचा गोंधळ निर्माण झाला आहे. सरपंच अजित शेलार यांनी कामे घेणार्‍या ठेकेदारांना 'मी कामाच्या स्थळाची आधी पाहणी करेन. माझा स्थळपाहणीचा दाखला घेणे आवश्यक आहे,' अशी विचित्र अट ठेकेदारांना घातली आहे; त्यातच निविदा 8 जूनला उघडण्याची तयारी असताना अगोदरच मर्जीतील ठेकेदारांना असा दाखला देऊन सरपंच शेलार गायब झाले आहेत.

ग्रामसेवक डी. एल. काळे, सदस्य नितीन कुतवळ, नितीन जगताप, दिलीप हांडाळ यांनी सांगितले की, सरपंचांच्या फोनची रिंग वाजते; परंतु तो उचलला जात नाही, ते संपर्कात नाहीत. विकासकामांचा निधी शिल्लक ठेवणे, सरपंच शेलार यांचा मनमानी कारभार आणि सदस्यांची तक्रार हा केडगाव ग्रामपंचायतीचा नित्याचा विषय झाला आहे.

कायम पाच वर्षे वादंग झालेल्या ग्रामपंचायतीत सध्याचे ग्रामसेवकही वैतागले आहेत. 'सरपंच मनमानी करतात. कायद्याला सोडून मला कामकाज करता येत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. कामांच्या निविदेत सरपंचांनी टाकलेली अट बेकायदेशीर असल्याने मी वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे,' असे ग्रामसेवक डी. एल. काळे यांनी सांगितले.

सरपंचांना विरोध केल्यास ते वेगळीच भाषा वापरतात, याची प्रचिती सदस्य बैठकीमध्ये उपस्थित असणार्‍या सदस्यांनी पाहिलेली आहे. आम्ही काम करताना बेकायदेशीर कुठलेही काम करण्याचा प्रयत्न केल्यास परिणाम आम्हाला भोगावा लागतो. या ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी ग्रामसेवकांनी केलेल्या कार्यप्रणालीचा आढावा घेता इथे काम करणे अवघड आहे, असेही त्यांनी सांगितले. एकंदरीत मोठी बाजारपेठ असलेल्या या ग्रामपंचायतीचा सावळागोंधळ दिवसेंदिवस वाढत असून, येथील विकासकामांबाबत नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

तालुक्यातील वरिष्ठांच्या नावावर धिंगाणा

तालुक्यातील वरिष्ठ नेत्याचा आपल्याला पाठिंबा आहे, अशा अविर्भावात सरपंच अजित शेलार दबाव तयार करतात, अशी तक्रार आहे, त्यामुळे या नेत्यांनीच आता त्यांच्या कारभाराची चौकशी करावी किंवा लावावी, अशी मागणी होत आहे, नाहीतर सरपंचांना वाचविताना केडगावसारख्या तालुक्यातील मोठ्या गावात नेत्यांची नाचक्की होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news