

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील दस्तनोंदणी विभागातील सुमारे 44 उपनिबंधकांनी बोगस दस्तनोंदणीत (खरेदीखत) कोट्यवधीचा मलिदा खाल्ला तरी शहरातील दस्तनोंदणी कार्यालयातील सध्या कार्यरत असलेले उपनिबंधक अजूनही चुपके चुपके तर काही कार्यालयांत बिनधास्तपणे दस्तनोंदणी (खरेदीखत, मालमत्ता विक्री) सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, याकडे जिल्हा निबंधक तथा मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी यांचे, त्याचप्रमाणे वरिष्ठ कार्यालयातील अधिकार्यांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात नोंदणी व मुद्रांक विभागाची 27 कार्यालये आहेत. त्यापैकी हडपसर (हवेली 3) हे कार्यालय तत्कालीन उपनिबंधकांनी मोठ्या प्रमाणावर केलेल्या बोगस दस्तनोंदणीमुळे बंद करण्यात आले आहे. तर मागील दीड वर्षापूर्वी सुमारे दहा हजार बोगस दस्तनोंदणी झाल्याप्रकरणी 44 उपनिबंधकांना निलंबित करण्यात आले होते. त्यापैकी कित्येकांची विभागाच्या बाहेर बदली करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे.
असे असले तरी शहरात अजूनही उपनिबंधक बिनधास्तपणे नियमांना फाटा देऊन 'अर्थपूर्ण' व्यवहार करून मालमत्ता तसेच नियमबाह्य असलेल्या सदनिकांची दस्तनोंदणी करीत असल्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. यामधून उपनिबंधकांची कमाई जोरदार होत असल्याची चर्चा आहे. बोगसपणे दस्तनोंदणी सुरू असल्याची बाब सर्वत्र जाहीर आहे. मात्र, याकडे जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (शहर) यांच्यासह मुद्रांक व नोंदणी विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी पूर्णपणे काणाडोळा केल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये उपनिबंधक असलेल्या महिला अधिकारी बिनधास्तपणे बोगस दस्तनोंदणी करीत असल्याची बाब पुढे आली आहे.
दस्तनोंदणी कार्यालयात कोणतेही शासकीय शिक्के संबंधित कागदपत्रांवर मारावयाचे असतील तर शासकीय कर्मचार्यांना ते काम करावे लागते. यासाठी अनेकवेळा कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे हे काम शिपायांनाच करावे लागते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हवेली 23 या कार्यालयतील शिपाई रजेवर आहे. परिणामी, दस्तांवर शिक्के मारण्याची जबाबदारी या कार्यालयतील उपनिबंधकांनी खासगी नागरिकावर सोपविली आहे. त्यामुळे शासकीय शिक्क्यांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत आता जिल्हा निबंधक काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा