

पुणे : पावसाळ्यापूर्वी धरणांची तपासणी आवश्यक असते. त्यानुसार जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळातील सर्व धरणांची तपासणी केली. सर्व धरणे सुरक्षित असल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला आहे. त्यातही खोर्यातील मोठ्या धरणांतील उजनी, दूधगंगा, राधानगरी, उरमोडी, टेंभू, खडकवासला, कोयना, पानशेत, वरसगाव, कुकडी यांसह इतर सर्वच धरणांची तपासणी 31 मेपूर्वी करण्यात आली आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत 1086 मोठे, मध्यम, लघु असे मोठ्या प्रमाणावर धरणांचे जाळे आहे. या धरणातून नागरिकांची तहान भागवली जाते. त्याचबरोबर शेतीसाठी पाणी दिले जाते. या धरणांच्या पावसाळ्यापूर्वी करावयाच्या आवश्यक त्या तपासण्या पूर्ण झाल्या असून, सर्व धरणे सुरक्षित आहेत, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी दिली.
पावसाळ्यापूर्वी 31 मेपर्यंत धरणांची तपासणी होते. त्यानंतर पावसाळ्यानंतरही तपासणी होते. ही तपासणी म्हणजेच धरणांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करावे लागते. या अहवालावरच धरणांतील पाणीसाठ्याचे नियोजन केले जाते. जलसंपदाकडील धरण सुरक्षा संस्था नावाच्या विभागाकडे धरणांची यादी असते.
त्यानुसार दरवर्षी ते ठरावीक धरणांची तपासणी करतात. तपासणी करताना प्रामुख्याने धरणांतील गळती मोजणे, सांडवा, धरणाचे वरील आणि खालील पिचिंग, दरवाजे कार्यरत आहेत किंवा कसे, देखभाल-दुरुस्ती आणि याबाबत केलेल्या नोंदीनुसार कामे झाली आहेत किंवा कसे, वीजपुरवठा, जनरेटरची सुविधा, अशा विविध घटकांची तपासणी होते.
हेही वाचा