‘त्या’ खड्ड्याने घेतला पाचवा बळी !!!

File Photo
File Photo

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गाची दुरवस्था झाली असून धनगरवाडी चौकात पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे येथे दररोज अपघात घडत आहेत. बुधवारी (दि. 7) रोजी घडलेल्या अपघातात एका व्यक्तीला प्राण गमवावे लागले आहेत. धनगरवाडी येथील खड्ड्यामुळे होणार्‍या अपघाताचा हा पाचवा बळी ठरला असून, अनेक जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला आणखी किती बळी हवे आहेत? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, की बुधवारी धनगरवाडी शिवारात दुचाकी व कंटेनरच्या अपघातात बाबासाहेब तुकाराम कुसळकर (वय 50, रा. भानसहिवरे, ता. नेवासा) यांचा मृत्यू झाला.

कंटेनर (एनएल 01 एन 4761) छत्रपती संभाजीनगरकडून नगरकडे येत होता. बाबासाहेब कुसळकर हेदेखील नगरकडे येत होेते. धनगरवाडी येथील खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळल्याने त्यांचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरखाली सापडून कुसळकर यांचा जागीच मृत्यू झाला. धनगरवाडी चौकातील दोन महिन्यांतील हा तिसरा बळी ठरला असून आतापर्यंत येथे पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तीन दिवसातील हा चौथा अपघात आहे, तर सुमारे 20 ते 25 जण अपघातात गंभीर जखमी झाल्याच्या घटना येथेच घडलेल्या आहेत.

अपघातानंतर कंटेनरचालक कंटेनरसह पळून जात होता. इमामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते शिशुपाल मोकाटे व एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने एमआयडीसी बायपास चौकात कंटेनर ताब्यात घेण्यात आला. घटनास्थळी पोलिस हवालदार मोहम्मद शेख, संदीप आव्हाड यांनी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. धनगरवाडी येथे दररोज अपघात घडत असून देखील रस्तादुरुस्ती तसेच खड्डे बुजविण्याचे काम होत नाही. पावसाळ्यात तर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानंतर अपघातांच्या प्रमाणात वाढच होण्याची भीती आहे. त्यामुळे तत्काळ रस्तादुरुस्ती व अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

आंदोलनाचा इशारा
छत्रपती संभाजीनगर महामार्गाची दुरवस्था झाली असून रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडलेले आहेत. महामार्ग दुरुस्तीसाठी पांढरीपूल पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारादेखील दिलेला आहे. तरीदेखील प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. धनगरवाडी येथील चौकात महामार्गावरच मोठा खड्डा पडल्याने येथे दररोज अपघात घडत आहेत. आतापर्यंत येथे अपघात घडून पाच जणांना आपले प्राण गमावले लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. येथील खड्ड्यात अपघातांची मालिकाच सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news